मुंबई : अंधेरी एमआयडीसी परिसरातील पुठ्ठ्यांच्या गोदामाला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दलाचे जवान गुरुवारी सकाळपर्यंत आग्निशमनाचे काम करीत होते. सुमारे दोन ते तीन हजार चौरस फूट जागेत ही आग पसरली होती.
हेही वाचा >>> मुंबई: डंपरची दुचाकीला धडक; पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू
अंधेरी (पूर्व) येथील सिब्झमधील एमआयडीसीतील एका चार मजली इमारतीच्या तळघरातील गोदामाला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आग लागली होती. तळघरातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर पुठ्ठे आणि अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. पुठ्ठ्यांमुळे ही आग पसरत गेली. त्यामुळे अग्निशमन दलाने तीन क्रमांकाची वर्दी दिली होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दोन सुरक्षा रक्षक अडकले होते. अग्निशमन दलाने या सुरक्षा रक्षकांना सुखरूप बाहेर काढले. तळघरात लागलेल्या आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावर धुराचे साम्राज्य पसरले होते. अग्निशमन दलाच्या अकरा गाड्या, पाण्याचे आठ टँकर असा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. गुरुवारी सकाळपर्यंत ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.