मुंबई : सीएसएमटी परिसरातील स्टर्लिंग सिनेमा थिएटरच्या मागील फ्रीमेसन सभागृहात शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अग्निशमन दलातील एक जवान जखमी झाला. नजीकच्या जीटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या इमारतीतील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, कुर्ला येथील कापडाच्या गोदामाला शनिवारी दुपारी आग लागली होती. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.
सीएसएमटी परिसरातील दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तात्काळ मदतकार्य हाती घेण्यात आले. तसेच, संबंधित महानगरपालिका विभाग कार्यालय आणि बेस्टच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांनीही सुरक्षित स्थळी पळ काढला. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने दुपारी २.३६ वाजता आगीला क्रमांक १ ची वर्दी दिली. आगीमुळे या परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे अग्निशामकांना आग विझवण्यात अडचणी येत होत्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण आठ गाड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. धुर आणि आगीमुळे अग्निशामकांना बचावकार्यात अडथळे येत होते. दरम्यान, या दुर्घटनेत फोर्ट अग्निशमन केंद्रातील अग्निशामक पंकज भोईर (२५) जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच, या आगीमुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फ्रीमेसन सभागृहाच्या इमारतीचेही मोठे नुकसान झाले. अखेर प्रयत्नांची पराकाष्टा करीत सायंकाळी ५.२० च्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
तसेच, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अग्निशमन दलातील जवानाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
कुर्ल्यातील कापडाचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
कुर्ला येथील कापडाच्या औद्योगिक गोदामाला १२.४५ च्या सुमारास आग लागली होती. आग लागताच गोदामालातील कामगारांनी तातडीने बाहेर पळ काढला. गोदामातील कापडांनी पेट घेतल्याने आगीची तीव्रता वाढली. आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात घेऊन अग्निशमन दलातर्फे दुपारी ३.१५ वाजता आगीला क्रमांक १ ची वर्दी दिली. दरम्यान, अग्निशमन दलाला दुपारी २.१३ वाजता आग विझवण्यात यश आले.