मुंबई :गोरेगाव पूर्व येथील खडकपाडा फर्निचर मार्केटमध्ये शनिवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. लाकडी वस्तूचे समान ठेवलेल्या पाच ते सहा गाळ्यांना आग लागली असून आगीची तीव्रता वाढली आहे. तब्बल दोन हजार चौरस मीटर परिसरात ही आग पसरली आहे.
गोरेगाव पूर्वेकडे रहेजा इमारत परिसरात खडकपाडा येथील फर्निचर मार्केटमध्ये सकाळी अचानक मोठी आग लागली. आगीमुळे आसपासच्या परिसरात धुराचे लोट पसरले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचा ताफा आग विझवण्याचे काम करीत आहे. आठ फायर इंजिन, पाण्याचे पाच ट्रॅन्कर घटनास्थळी असून आगीची तीव्रता वाढल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले आहे.
या आगीत लाकडी सामान, प्लास्टिक, थर्माकोल, प्लायवुड, भंगार सामान आदी मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. अग्निशमन दलाने ११.१८ च्या सुमारास आगीसाठी श्रेणी १ ची वर्दी दिली होती. मात्र आगीची तीव्रता वाढताच ११.२४ वाजता आगीची श्रेणी क्रमांक २ ची वर्दी देण्यात आली. क्षणाक्षणाला आग अक्राळविक्राळ रुप धारण करीत होती. अग्निशमन दलाने अखेर ११.४८ च्या सुमारास श्रेणी ३ ची वर्दी दिली. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.