मंत्रालयातील आगीत तीन मजले भस्मसात होण्याची घटना काही महिन्यांपूर्वीच घडलेली असताना शनिवारी सकाळी चौथ्या मजल्यावर पुन्हा आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पण दुरुस्ती कामे सुरू असल्याने लागलेली ही आग किरकोळ स्वरुपाची होती आणि अग्निशमन दलाने ती त्वरित शमविली. या आगीत जीवित किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी सांगितले.
महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने मंत्रालयास सुटी होती. पण विधिमंडळ अधिवेशन असल्याने अर्थसंकल्प तयारी व अन्य कामांसाठी काही कर्मचारी कामावर आले होते. मंत्रालय दुरुस्तीचे कामही वेगाने सुरु असल्याने हे कामगार काम करीत होते. चौथ्या मजल्यावर सुमारे १० बाय १० जागेत रासायनिक पदार्थ ठेवण्यात आले होते. इमारत मजबुतीकरणासाठी त्यांचा वापर करण्यात येत आहे. वेल्डिंगच्या कामामुळे किंवा अन्य कारणामुळे तेथे आग लागली. धूर दिसताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान धावून गेले. आगीच्या मागच्या घटनेनंतर अग्निशमन दलाचे दोन बंब, रुग्णवाहिका आणि काही जवान मंत्रालयात २४ तास तैनात आहेत. आगीचे वृत्त कळताच नियंत्रण कक्षाला कळवून तातडीने जादा गाडय़ा मागवून घेण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी पाण्याचा जोरदार मारा करुन लगेच ही आग विझविण्यात यश मिळविले.
आग लागल्याचे समजताच मुख्य सचिव बांठिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त पोलिस आयुक्त, महापालिका अतिरिक्त आयुक्त आदींनी तातडीने मंत्रालयात धाव घेतली. जे कर्मचारी मंत्रालयात काम करीत होते, त्यांना व दुरुस्ती काम करणाऱ्या कामगारांना खबरदारी म्हणून लगेच इमारतीबाहेर काढण्यात आले. आगीचे नेमके कारण सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा