मॉन्ट ब्लँकच्या आगीने वेढलेल्या १२ व्या मजल्या खालील ११, तर वरच्या १५ मजल्यांवर रहिवाशी अडकले होते.. आगीमुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. धुराच्या साम्राज्यात रहिवाशांना वाचविण्याचे मोठे आव्हान होते.. पण अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि १३ ते २७ या मजल्यांवर अडकलेल्या ३५ रहिवाशांची सुखरुप सुटका केली.
अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षामध्ये मॉन्ट ब्लँकमधून दूरध्वनी खणखणत होते. आम्ही इमारतीत अडकलो आहोत, आमची सुटका करा, अशा विनवण्या रहिवाशी करीत होते. नियंत्रण कक्षातील अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची माहिती त्यांना देत होते. आगीचे लोळ वरच्या मजल्यांचा घास घेण्याच्या तयारीत होते. त्यामुळे वरच्या मजल्यांवरील रहिवाशी मदतीची याचना करीत होते.
अखेर आग शमवितानाच वरच्या मजल्यावरील रहिवाशांची इमारतीतून सुखरुप सुटका करण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती रहांगदळे यांनी दिली. काही जण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरसावले, तर काही जण मुसंडी मारत वरच्या मजल्यावर पोहोचले. धुरातून एकेका रहिवाशाला इमारती खाली आणण्यास सुरुवात झाली. एक क्षुल्लक चुकही जीवावर बेतणारी होती. पण जवानांनी मोठय़ा जिद्दीने मदतकार्य सुरूच ठेवले.
काही रहिवाशी जीव वाचविण्यासाठी घराबाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. पण कक्षातील अधिकाऱ्यांनी त्यांचे मन वळविले आणि घरातच थांबण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद दिल्यामुळे अनेकांचे जीव वाचले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा