कचऱ्याची दरुगधी, धुराने होणारी घुसमट सोसत काम करण्याची वेळ
कडक उन्हाचे चटके आणि कचऱ्याखाली धुमसणाऱ्या आगीची धग अशा दाहक परिस्थितीचा सामना अग्निशमन दलाच्या जवानांना देवनार कचराभूमीत करावा लागत आहे. त्यातच पालिकेने दिलेल्या गणवेशामुळे होणारी प्रचंड जळजळ सहन करीत जवान कचराभूमीत तैनात आहेत. धुरामुळे घुसमटणाऱ्या जवानांना नियमाच्या अडसरामुळे अग्निशमन दलाच्या बंबात उपलब्ध प्राणवायूच्या सिलिंडरचा वापर करता येत नाही. कचऱ्याच्या ढिगाऱ्यालगत उभ्या असलेल्या आपल्या वाहनांमध्येच दरुगधी सहन करीत त्यांना जेवण उरकावे लागत आहे. या वातावरणामुळे अग्निशमन दलाचे जवान आजारी पडण्याची वेळ ओढवली आहे. अशा अनेक समस्यांना तोंड देत जवान नेटाने कचराभूमीत सज्ज आहेत, पण त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही.
देवनार कचराभूमीत सातत्याने आग लागत असल्यामुळे तेथे अग्निशमन दलाच्या दहा गाडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. कचराभूमीत धूर येताना दिसताच अग्निशमन दलाचे जवान तेथे धाव घेतात आणि धुमसणाऱ्या कचऱ्यावर पाण्याची फवारणी सुरू करतात. काही वेळा मोठय़ा प्रमाणावर धुमसणाऱ्या कचऱ्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडत असतो. धूर सहन करीत जवान कचऱ्यावर पाण्याचा मारा करीत असतात. काही वेळा जवानांना धुरामुळे घुसमटू लागते. सहकारी जवानाला पाणी फवारणीसाठी उभे करून त्याला काही काळ धुरापासून लांब जावे लागते. वर्दीवर असलेल्या जवानाला गुदमरत असल्यास त्याच्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबामध्ये प्राणवायूचे सिलिंडर ठेवण्यात आलेले असतात. मात्र आग विझविताना अनैसर्गिक ठिकाणी म्हणजे बंद जागेमध्ये गुदमरणाऱ्या जवानाला ते वापरता येतात. खुल्या जागेत आग विझविणाऱ्या जवानांना ते वापरता येत नाहीत. या सिलिंडरची क्षमता केवळ अर्धा तास प्राणवायू पुरेल इतकी आहे. त्यामुळे कचराभूमीत धुरामुळे गुदमरणाऱ्या जवानांना त्याचा वापर करता येत नाही.
ही कचराभूमी १३२ हेक्टर जागेत उभी आहे. केव्हा कुठल्या भागात आग लागेल याचा नेम नाही. त्यामुळे कचराभूमीत आग विझविण्यासाठी गेल्यानंतर पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. बहुतांश वेळा कचऱ्याच्या ढिगाऱ्यालगत उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीतच कसेबसे जेवण उरकावे लागते. अनेकदा दरुगधीमुळे जेवण्याची इच्छाही होत नसल्याचे काही जवानांनी सांगितले. पालिका आयुक्तांच्या आदेशामुळे सकाळी ९च्या सुमारास नाश्ता येतो, पण त्यानंतर साधे पिण्याचे पाणीही मिळत नाही. यामुळे येथे काम करणारे जवान आजारी पडू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी चक्कर आल्याने आणि गुदमरल्यामुळे दोन-तीन जवानांना रुग्णालयात नेण्याची वेळ आली होती, अशी माहिती या जवानाने दिली. जवानांना रेमंड कंपनीच्या कापडाचे गणवेश देण्यात आले आहेत. पण आगीच्या वर्दीवर गेल्यानंतर उष्णतेमुळे या गणवेशात प्रचंड जळजळ होते. सध्या कचराभूमीत आग विझवताना प्रचंड त्रास होत आहे, पण या प्रश्नांकडे कुणीच लक्ष देत नाही, अशी खंत या जवानाने व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा