मुंबई: वांद्रे (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवरील ‘लिंक स्क्वेअर’ मॉलमध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. मॉलच्या तळघरात लागलेली आग विझवण्यासाठी फायर रोबोटचा वापर करण्यात आला. पण रोबोटच्या स्क्रीनवर डेब्रीज पडल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आले. या मॉलमध्ये १९८ दुकाने आहेत. मॉलमधील तळघरात लागलेल्या आगीबाबत सुरुवातीला कुणालाची कळले नाही. मात्र मॉलमधून धूराचे लोट बाहेर येऊ लागताच परिसरात एकच गोंधळ उडाला. क्षणार्धात मॉलला आगीचा वेढा पडला. वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोड क्रमांक ३३ येथील ‘लिंक स्क्वेअर’ मॉलमधील क्रोमाच्या मोठ्या दुकानात मंगळवारी पहाटे भीषण आग लागली.

मॉल स्वरूपाचे हे दुकान असून जमिनीखाली ३ तळमजले आणि वर तीन मजले अशा स्वरूपाचा हा मॉल आहे. आग तळमजल्यावर लागली होती. मात्र काही वेळाने ही आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली. यावेळी तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. आगीची वर्दी मिळताच घटनास्थळी मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल, विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, मुंबई पोलीस, अदानी इलेक्ट्रिक वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथकचे पथक पोहोचले आणि त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

मॉल लगतची इमारत सुरक्षिततेच्या कारणास्तव अग्निशमन दलाने रिकामी केली. पण तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात धूर पसरल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मॉलमध्ये शिरणे कठीण झाले होते. अखेर अग्निशमन दलाने तळघरामध्ये रोबोट पाठवून आग विझण्याचा प्रयत्न केला. हा रोबोट काही अंतर आत गेला. तेथे सर्वत्र धूर पसरला होता. तेवढ्यात वरून रोबोटच्या स्क्रीनवर डेब्रिज पडले. त्यामुळे रोबोट बाहेर आणण्यात आला.

फायर रोबोट

मुंबईत मोठया प्रमाणावर मॉल, चित्रपटगृहे, उत्तुंग इमारती बांधल्या जात आहेत. या इमारतींमध्ये तळघरात बहुमजली वाहनतळ बांधण्यात येत आहे. मात्र, अशा ठिकाणी आग लागल्यास तळघरात साठलेल्या धुरामुळे अग्निशमन जवानांना आग विझवण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो. तसेच मुंबईतील पेट्रोकेमिकल कारखाने, अणू ऊर्जा संशोधन केंद्र येथे आगीच्या दुर्घटना घडल्यास अशा ठिकाणी यंत्रमानवाद्वारे पाणी फवारण्याचे काम करता येते. तसेच जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये आग लागल्यास किंवा सागरी किनारा मार्ग व मेट्रोच्या बोगद्यांमध्ये आग लागल्यास तिथेही त्यांचा वापर केला जातो. वांद्रे येथेही लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये लागलेली आग विझविण्यासाठी या रोबोटचा वापर करण्यात आला.

शेजारच्या इमारती रिकाम्या केल्या

आगीचे आक्राळविक्राळ स्वरूप लक्षात घेऊन शेजारच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या. शेजारच्या ‘मे क्वीन’ इमारतीत राहणाऱ्या रहिवाशाना बाहेर पडण्यास सांगण्यात आले होते. या इमारतीतील रहिवासी रोमा अहुजा यांनी सर्वप्रथम परिसरात धूर पाहिला. त्यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकाला याबाबत विचारले असता त्याने शेजारच्या मॉलमध्ये आग लागल्याचे त्यांना सांगितले. त्यापूर्वी तेथे अग्निशमन दलाचे जवान पोहोचले होते.