शहराच्या कोणत्याही भागात अत्यंत कमी वेळात पोहोचू शकणाऱ्या आणि छोटय़ा आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यास उपयुक्त ठरणाऱ्या अशा राज्यातील पहिल्याच फायर फायटिंग मोटर बाइक येत्या काही दिवसांत ठाण्यात धावू लागणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यात विशेषत: किसननगर, लोकमान्य नगर, कळवा, मुंब्रा-कौसा, दिवा यांसारख्या भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामामुळे चिंचोळे रस्ते असून काही काही भागांत तर छोटय़ा वाहनातूनही जाता येत नाही. अशा भागात आग लागली तर ती विझविण्यासाठी पोहोचणे हे अग्निशमन दलाच्या जवानांसाठी दिव्यच असते. शहरात घडणाऱ्या आगींच्या घटनांपैकी बहुतांश घटना शॉर्ट सर्किट, स्टोव्हचा भडका उडणे, गॅस सिलेंडरची गळती अशा कारणांनी घडतात. अडगळीच्या, गर्दीच्या ठिकाणी लागलेली अशी छोटी आग भडकून पसरण्याआधीच तेथे पोहोचून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी खास फायर फायटिंग मोटर बाइक खरेदी करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला. एएसकेए फायर फायटिंग या कंपनीकडून या खास अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त मोटर बाइक बनवून घेण्यात आल्या असून त्यात छोटी आग विझविण्यासाठी लागणारी साधनसामुग्री असेल. आगीचा संदेश मिळताच अग्निशमन दलाचा जवान काही मिनिटांत ही बाइक घेऊन घटनास्थळी पोहोचेल आणि आगीवर नियंत्रण मिळवेल.

पहिल्या टप्यात सहा बाइक खरेदी करण्यात आल्या असून लवकरच त्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात सामील होतील. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची व्याप्ती वाढवून अधिक प्रमाणात अशा बाइक आणण्यात येतील.

– संजीव जयस्वाल, ठाणे महापालिका आयुक्त

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire fighting bikes at thane