पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरिवली येथील उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या गाडय़ांना सोमवारी सकाळी अचानक आग लागली. या घटनेत २५ गाडय़ा जागीच बेचिराख झाल्या. यामागे काही समाजकंटकांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या आगीमुळे हलक्या स्वरूपाचे काही स्फोटही झाल्याने उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.
या गाडय़ा उड्डाणपुलाखाली काही दिवसांपासून उभ्या होत्या. या गाडय़ांनी सोमवारी सकाळी अचानक पेट घेतला. ही आग एवढी झपाटय़ाने पसरली की, काही वेळातच २५ गाडय़ा आगीच्या विळख्यात सापडल्या. या गाडय़ांमध्ये इंधन असल्याने आणखीनच जोरदार भडका उडाला. या दरम्यान उड्डाणपुलाखाली छोटे छोटे स्फोटही झाले. त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. काही वेळात आग आटोक्यात आली. तरीही पेट्रोलमुळे ज्वाळा उठतच होत्या. उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटांमुळे पुलाचे किती नुकसान झाले हे पाहणी केल्यानंतरच सांगता येईल, असे अग्निशमन दलाने सांगितले. या आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसले, तरी घातपाताची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Story img Loader