मुंबईतील गिरगावमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीत १४ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये सहा चारचाकी आणि सात दुचाकींचा समावेश आहे. गोदामात ही आग लागली होती. गाड्या गोदामाच्या बाहेर उभ्या करण्यात आल्या होत्या. लोक आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच गाड्याही आगीत जळाल्या.
आगीमध्ये जळालेल्या गाड्यांमध्ये सहा चारचाकी, सात दुचाकी, स्कूटर आणि एका रिक्षाचा समावेश आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुंद रस्ता असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. दरम्यान, पाच टँकरच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.
सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालं नाही. गोदाम गेल्या अनेक वर्षांपासून बंद असताना ही आग नेमकी कशी लागली याची माहिती घेतली जात आहे. फटाक्यांमुळे ही आग लागली असण्याचाही शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.