मुंबई : धारावीमध्ये शाहूनगर परिसरात कमला नगर झोपडपट्टीत बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत ६० बहुमजली झोपड्या जळाल्या आहेत. विद्युत वाहिन्या, कपडे, कागद असे सामान या आगीत जळून खाक झाले आहे.दाटीवाटीने वसलेल्या धारावी झोपडपट्टीत पहाटे अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या धारावी केंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही आग लागली होती.
मात्र अत्यंत अरुंद गल्ल्या, दाटीवाटीने असलेल्या झोपड्या, त्यातील ज्वलनशील वस्तू यामुळे ही आग पसरली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. पहाटेच्या वेळी लोक झोपेत असताना ही भीषण घटना घडली. या झोपड्यांमध्ये धारावीत विविध व्यवसाय चालतात. दोन, तीन मजली झोपड्यांमध्ये कापड शिलाई, बॅग बनवणे असे व्यवसाय चालत असल्यामुळे त्याच्याशी संबंधित खूप सामान या झोपड्यांमध्ये, गोदामात होते. त्याला देखील आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या २० ते २५ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे काम करीत होत्या. पाच तास झुज दिल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.