कांदिवली पश्चिम येथील चारकोपच्या सेक्टर ८ परिसरातील खारफुटीत सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आग लागली. मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आगीमुळे खारफुटीचे नुकसात झाले. दरम्यान, ही आग लागली की लावली, असा प्रश्न आसपासच्या परिसरातील स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा >>> फसवणूक करून पाच महिलांशी लग्न करणे महागात पडले; आरोपीला अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
मागील वर्षी कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरातील खारफुटीत आठ वेळा आग लागली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा आढळून येतो, अशी माहिती चारकोपमधील रहिवासी आणि पर्यावरणवादी मिली शेट्टी यांनी दिली. अचानक सोमवारी सायंकाळी येथे आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रुप घेतले. दरम्यान, चारकोपमध्ये सुमारे १३६ हेक्टर क्षेत्रफळावर खारफुटी असल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचण्यापूर्वी खारफुटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आग पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, या परिसरात वारंवार आगी लागत आहेत. येथील कचरा आणि राडारोड्यामुळे डास आणि प्रदूषणाच्या त्रासाला स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्यामुळे आग पसरण्याचा धोका निर्माण होतो. संरक्षित क्षेत्र असलेल्या खारफुटी परिसरात वारंवार आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मात्र या घटना रोखण्यासाठी योग्य पावले उचलण्यात येत नाहीत, अशी खंत रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली.