मुंबईत विले पार्लेमध्ये (पश्चिम) प्राईम मॉलला भीषण आग लागल्याची घटना घडली. यानंतर तातडीने १२ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्याकडून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग लेव्हल ४ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिलीय.
या आगीनंतर प्राईम मॉलच्या वरच्या भागातून प्रचंड धुराचे लोट येतानाही दिसले. त्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र, अग्निशमन दल ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
प्राईम मॉलची ही इमारत ४ मजली आहे. यात एक अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी झाला. याशिवाय अन्य एकजण आगीत होरपळून गंभीर आहे. सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी ही आग लागली. यानंतर काही मिनिटातच १० वाजून २७ मिनिटांनी अग्निशमन दल घटनास्थळावर पोहचलं, अशी माहिती देण्यात आली. सुरुवातीला ही आग तळघरात आणि पहिल्या मजल्यापर्यंत मर्यादित होती.
या आगीला नियंत्रित करतानाच जखमी झालेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचं नाव मंगेश गावकर (५४) असं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, २० वर्षीय मुबासीर मोहम्मद हा तरूण आगीत होरपळून आणि धुरामुळे गुदमरून गंभीर आहे. या दोघांनाही जवळच्या मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आलायं.
हेही वाचा : Mumbai Powai Fire: कार सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव; स्फोटाचे आवाज, अनेक गाड्या जळून खाक
पवईतील कार सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव; स्फोटाचे आवाज, अनेक गाड्या जळून खाक
मुंबईतील पवई भागात १८ नोव्हेंबरला मोठं अग्नितांडव पाहायला मिळालं. पवईतील साकी विहार रोडवरील साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागली. या आगीत अनेक गाड्या जळून खाक झाल्या. ही आग इतकी मोठी होती की यामुळे जवळच्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. ही आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली होती. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. या आगीत कोट्यावधींच्या गाड्या जळून खाक झाल्या. याशिवाय या ठिकाणी अनेक कामगार देखील काम करत होते. ते अडकल्याचा अंदाज वर्तवला होता.