मुंबई : मध्य रेल्वेवर मार्गावर डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान गोरखपूर एक्स्प्रेसमधून धुराचे लोट, किरकोळ आग आणि ठिणग्या उडत असल्याने, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गाडीच्या ‘ब्रेक बाइंडिंग’ची समस्या झाल्याने एक्स्प्रेसची चाके रेल्वे रूळावरून व्यवस्थित धावू शकत नव्हती. या बिघाडामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळी ६.३२ च्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर गोरखपूर एक्स्प्रेसच्या एस-८ डब्यांमध्ये धुराचे लोट आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यानंतर डब्याखालून आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तत्काळ दुरुस्तीची कामे करून सकाळी ६.५१ ला धुराचे लोट आटोक्यात आणले आणि एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ झाली.

हेही वाचा…कोकण रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना एसटीचा आधार, विशेष बस सोडण्यात आल्याने दिलासा

गोरखपूर एक्स्प्रेसच्या बिघाडामुळे तपोवन, इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. तसेच सकाळी गर्दीच्यावेळी बिघाड झाल्याने, अनेक लोकल सेवा खोळंबल्या. परिणामी, सकाळच्या वेळी कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांना विलंबयातना सहन कराव्या लागल्या.

Story img Loader