खार रेल्वे स्टेशनजवळ लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे बोरीवलीच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. पावणेआठच्या सुमारास वांद्रे ते खार रेल्वे स्थानकादरम्यान पादचारी पुलावरुन कापडाचा एक तुकडा जलद मार्गावरील ओव्हरहेड वायरवर पडला. यामुळे ओव्हरहेड वायरने पेट घेतला. ही आग जलद मार्गावरुन जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफपर्यंत पोहोचली.
आगीचे लोळ डब्ब्यापर्यंत पोहोचल्यानंतर लगेचच लोकल थांबवून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. आता जलद मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असून लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. नोकरदारांच्या कामावरुन घरी जाण्याच्यावेळी ही घटना घडल्यामुळे लोकल प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
आगीची घटना घडल्यानंतर जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली होती. काहीवेळासाठी विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. पश्चिम रेल्वे प्रशासनाने झटपट हालचाल करत जलद मार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.