मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालयाला शुक्रवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात ही आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
रुग्णालय आणि प्रसूतिगृहातील ‘यूपीएस’ खोलीत आग लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली. अग्निशमन दलाच्या आठ गाडय़ा, सहा पाण्याचे ट्रँकर, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रुग्णालयाच्या खिडकीतून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्यामुळे परिसरात एकच घबराट निर्माण झाली. धूर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पोहोचला होता. त्यामुळे जवळच्या वॉर्डमधील सर्व रुग्णांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयाच्या बाहेर रुग्णाच्या नातेवाईकांची, परिसरातील नागरिकांची गर्दी जमली होती. पावणेनऊ वाजता ही आग विझवण्यात यश आले.