दक्षिण मुंबईतील संवेदनशील विभागातील रिझव्र्ह बँकेच्या इमारतीत एका तरुणाने गोळीबार करून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.
फोर्टमधील रिझव्र्ह बँकेच्या इमारतीखाली मंगळवारी संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास हा प्रकार घडला. पदमगिरी रावशेखर (२७) हा मिंट रोड येथील प्रवेशद्वारातून इमारतीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता. रक्षकांनी त्याला अडविले असता त्याने आपल्या जवळील बंदुकीने हवेत गोळीबार केला. सुरक्षारक्षकांनी तात्काळ त्याच्यावर नियंत्रण मिळवून त्याला पकडून ठेवले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आमच्या सुरक्षा रक्षकाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या गोळीबारात कुणी जखमी झाले नसल्याचे रिझव्र्ह बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले.
माता रमाई आंबेडकर पोलिसांनी पदमगिरी याला अटक केली. त्याने गोळीबार केलेली बंदूक एअर गन असल्याचे निष्पन झाले.या घटनेची आम्ही कसून चौकशी करत असून तो देत असलेल्या माहितीची खातरजमा करत आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदमाकर जुईकर यांनी सांगितले. पदमगिरी याची मानसिक स्थिती ठीक नसून तो नैराश्यग्रस्त झालेला आहे. गेल्या महिन्यात तो दोन वेळा मुंबईत येऊन गेला होता. मंगळवारी सकाळी सात वाजता तो पुन्हा मुंबईत आला. दिवसभर तो एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने २०११ मध्ये केरळमधील कोची येथून ही बंदूक विकत घेतली होती. त्याच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी कुटुंबाला सोडले होते. तर त्याच्या आईने इतरांशी संबंध प्रस्थापित केले होते. तो वैफल्यग्रस्त असला तरी त्याचा इमारतीत घुसण्याचा उद्देश अद्याप स्पष्ट झाला नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक) कृष्णप्रकाश यांनी दिली. स्थानिक पोलीस ठाणे आणि गुन्हे अन्वेषण शाखा या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा