मुंब्रा येथील इशरत जहाँ प्रकरणात तिच्या कुटुंबियांना मदत करणाऱ्या मोईनउद्दीन सय्यद उर्फ मुन्ना ताहील (४०) यांच्यावर  सोमवारी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी गोळीबार केला. मात्र, गोळी कारला लागल्याने ते या हल्ल्यातून बचावले आहेत.
राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या मुन्ना यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच राजकीय नेत्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मोईनउद्दीन सय्यद उर्फ मुन्ना ताहील (४०) यांचे मुंब्रा भागात साहील या नावाचे हॉटेल आहे. तसेच ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये पोलिसांच्या चकमकीत मुंब्रा येथील इशरत जहाँ या तरूणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तिच्या कुटुंबियांना मुन्ना हे मदत करीत आहेत.  
सोमवारी सकाळी ते काही कामानिमित्त कारने मुंब्य्राहून ठाण्याला येत होते. दरम्यान, मुंब्रा-रेतीबंदर परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या दिशेने एक गोळी झाडली. मात्र, ही गोळी कारला लागल्याने  ते हल्ल्यातून बचावले.
या प्रकारानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुन्ना यांच्यावरील हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बलात्कारी बापास अटक
मुंब्रा येथील कौसा भागात पित्यानेच आपल्या १३ वर्षीय मुलीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कौसा भागात पीडित मुलगी राहत असून वडीलांसोबत झालेल्या घरगुती भांडणातून तिची आई घर सोडून गेली होती. त्यामुळे ही मुलगी आणि तिची तीन भावंडे वडिलांसोबतच राहत होती. दरम्यान, शनिवारी सकाळी तिच्या वडिलांनी मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
याबाबत माहिती मिळताच या मुलीच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तिच्या वडीलांना अटक केली.  याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.