लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : पैशांच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादातून शनिवारी सकाळी एका सराईत आरोपीने त्याच्याच मित्रावर गोळीबार केल्याचा गंभीर प्रकार ॲन्टॉप हिल परिसरात घडला. या हल्ल्यात आकाश कदम उर्फ स्वामी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी आकाश सध्या ॲन्टॉप हिलमधील नवतरूण नाईक नगरमध्ये रहायला आला होता. आरोपी विवेक शेट्टीयार (४०) याचा मित्रासोबत पैशांवरून वाद झाला होता. शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास विवेकने आकाशच्या घरी जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पोटात गोळी लागून आकाश जमिनीवर कोसळताच विवेकने तेथून पळ काढला.
आणखी वाचा-मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
गोळीबाराच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. आसपासच्या रहिवाशांनी जखमी आकाशला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पोटात डाव्या बाजूला एक गोळी लागली आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची वर्दी मिळताच ॲन्टॉप हिल पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. आकाशच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ॲन्टॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीत आरोपी विवेक हा टॅक्सीतून तेथे आला होता. आकाशविरोधातही यापूर्वी गुन्हा दाखल आहे. तसेच विवेकविरोधात हत्येच्या प्रयत्नासह सात गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांसह गुन्हे शाखेच्या कक्ष-४ चे पोलिसही समांतर तपास करीत आहेत.