मुंबई : कुलाबा येथील बधवार पार्क परिसरात पहिले वातानुकूलित अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे. मुंबई महापालिका आणि सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) हे अभ्यास केंद्र अद्ययावत करण्यात आले आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात या परिसरात गरीब घरातील होतकरू मुलांना शांतपणे अभ्यास करता येणार आहे.
कुलाबा येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील जुन्या अभ्यास केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी वातानुकूलित अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले असून सोमवारी या अभ्यासकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. बुधवार पार्क येथील मुख्य सिग्नलजवळ असलेल्या या केंद्रात आता एका वेळी सुमारे ३० विद्यार्थी अभ्यास करू शकणार आहे. या अभ्यास केंद्रात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाके आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. हे अभ्यास केंद्र सकाळी ११ ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत खुले राहील.
कुलाबामधील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि त्यांचे बंधू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने सीएसआर निधीतून हे अभ्यास केंद्र तयार करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या अभ्यास केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या केंद्राचा फायदा शिवशक्ती नगर, महात्मा ज्योतिबा फुले नगर, गरीब जनता नगर, स्टील गोडाऊन इत्यादी शेजारच्या झोपडपट्ट्यांमधील शेकडो विद्यार्थ्यांना होईल, अशी अपेक्षा मकरंद नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.
बधवार पार्क येथील अभ्यास केंद्राच्या धर्तीवर भविष्यात अशी आणखी केंद्रे बांधण्यात येतील. कुलाबा येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील या जुन्या अभ्यास केंद्राच्या नूतनीकरणाची आवश्यकता होती. सीएसआरअंतर्गत निधी मिळाल्यामुळे हे शक्य झाले, असे मत नार्वेकर यांनी व्यक्त केले.
या केंद्राला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. या अभ्यास केंद्रात शिकणारे विद्यार्थी गरीब घरातील आहेत. परंतु ते खूप महत्त्वाकांक्षी आहेत. नागरी सेवा आणि राज्य सेवा आयोगांसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी हे विद्यार्थी करतात. मात्र त्यांची घरे लहान असल्यामुळे त्यांना अभ्यासासाठी जागा नसते. त्यामुळे हे विद्यार्थी अभ्यासिकेत येऊन अभ्यास करतात. वातानुकूलित अभ्यासिका असल्यामुळे उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुसह्य होईल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.