मुंबई : वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी २०२४ हे वर्ष समाधानकारक, तर काहीसे आव्हानात्मकही ठरले होते. त्यानंतर नव्या वर्षात जानेवारी महिन्यातच जवळपास सात ते आठ मराठी चित्रपट प्रदर्शित होऊन एक दमदार सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘फसक्लास दाभाडे’ या मराठी चित्रपटाच्या चमूने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी काही निवडक चित्रपटगृहांत ११२ रुपयांत तिकीट देऊन प्रेक्षकांना सुखद धक्का दिला.
विनोदासह हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली दाभाडे कुटुंबाची कहाणी म्हणजेच ‘फसक्लास दाभाडे’ हा मराठी चित्रपट शुक्रवार, २४ जानेवारीपासून सर्वत्र प्रदर्शित झाला. हेमंत ढोमे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल. राय आणि क्षिती जोग आहेत. तर क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, उषा नाडकर्णी, मिताली मयेकर, राजसी भावे हे कलाकार चित्रपटात आहेत. या वर्षी पहिला ‘सिनेमा लव्हर डे’ हा गेल्या शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला होता. या दिवशी देशभरातील हजारो चित्रपटगृहांत ९९ रुपयांत चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती. त्याचा फायदा ‘संगीत मानापमान’सारख्या मराठी चित्रपटालाही झाला. त्यानंतर या शुक्रवारी ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाच्या चमूने स्वतंत्ररित्या आपल्या चित्रपटासाठी फक्त प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील काही निवडक चित्रपटगृहात ११२ रुपयांत तिकिट प्रेक्षकांना देऊ केले. त्यामुळे पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटगृहात ‘फसक्लास दाभाडे’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी हाऊसफुल गर्दी केली.
मुंबईत मिराज सिनेमा, मूव्ही टाइम, बालाजी सिनेप्लेक्स, राजहंस सिनेमा, गोल्ड, मॅक्सस, मुक्ता ए २, मूव्ही मॅक्स, सिनेपोलिस या महाराष्ट्रातील चित्रपटगृहांच्या शाखांमध्ये शुक्रवारी ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपट ११२ रुपयांत दाखविण्यात आला.
चित्रपटांसाठी मौखिक प्रसिद्धी महत्त्वाची
मराठी प्रेक्षक हे मराठी चित्रपट पाहायला सहसा शुक्रवारी चित्रपटगृहात जात नाहीत. परिणामी, अनेक चित्रपट चांगले असूनही त्यांना प्रसिद्धीअभावी आर्थिक यश साधता येत नाही. त्यामुळे जर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचला, तर त्याची मौखिक प्रसिद्धी होईल आणि चित्रपटाला चांगले यश मिळेल. आम्ही आर्थिक तोट्याचा कोणताही विचार केला नाही, चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. यासाठी चित्रपटगृह मालकांसोबत योग्य तो समन्वय साधण्यात आला आणि त्यांनी उत्तम सहकार्य केले’, असे चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.