सुशांत मोरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेल्वे बोर्डाने वातानुकूलित लोकलबरोबरच सामान्य लोकलच्या (विनावातानुकूलित लोकल) प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात कपात केली असून नव्या दरांची ५ मेपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानंतर वातानुकूलितबरोबरच सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात प्रवाशांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. वाढत्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना या डब्यातून उभ्याने प्रवास करावा लागत आहे. सध्या लोकलच्या प्रथम श्रेणीतून दररोज चार लाख ६१ हजार १२१ प्रवासी प्रवास करीत असून एप्रिल २०२२ च्या तुलनेत यामध्ये तीन लाख ३७ हजार ३६३ प्रवाशांची भर पडली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा >>>Video: रोज गांजा घ्या.. मुंबईत रस्त्यावर झळकले पोस्टर; मुख्यमंत्री शिंदेंना नेटकरी म्हणतात, “तुम्ही आता..”

वातानुकूलित लोकल सेवेला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला होता. त्याचबरोबर प्रथम श्रेणी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे बोर्डाने याही श्रेणीच्या तिकीट दरात ४० ते ५० टक्क्यांनी कपात केली. या दर कपातीमुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकल सेवांना काही प्रमाणात प्रतिसाद वाढू लागला आहे. त्याचबरोबर लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातील प्रवाशांच्या गर्दीत मोठी वाढ होऊ लागली आहे. एप्रिल २०२२ मध्ये दररोज एक लाख २३ हजार ७५८ प्रवासी प्रवास करीत होते. मे महिन्यात तिकीट दरात कपात केल्यानंतर दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाख १९ हजार ९४, तर जूनमध्ये दोन लाख ३५ हजार ७५० वर पोहोचली. नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या चार लाख ६१ हजार १२१ पर्यंत पोहोचल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे प्रथम श्रेणीचे तिकीट किंवा पास काढूनही अनेक प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे.

हेही वाचा >>>‘मुंबई सुशोभिकरण प्रकल्प’:कामाचा दर्जा आणि नियोजित वेळांवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती स्थापन करणार

मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एप्रिल २०२२ मध्ये ५१ हजार १७० वर पोहोचली होती. ५ मेपासून केलेल्या तिकीट दर कपातीमुळे नोव्हेंबरमध्ये प्रवाशांची संख्या दोन लाख ७० हजार झाली आहे.लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात सामान्य डब्यातील प्रवासी मोठ्या प्रमाणात घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे प्रथम श्रेणीचा पास किंवा तिकीट काढूनही या प्रवाशांना बसण्यासाठी आसन किंवा उभे राहण्यासाठी जागाही उपलब्ध होत नाही. सामान्य डब्यातील प्रवासी सामान्य तिकीट किंवा पासावर प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करीत आहेत. तर काही प्रवासी विनातिकीटही प्रथम श्रेणी डब्यात घुसखोरी करीत आहेत. मध्य रेल्वे तिकीट तपासनीसांनी जानेवारी – नोव्हेंबर २०२२ पर्यंत ७८ हजार ९९४ घुसखोर प्रवाशांवर कारवाई केली. २०२१ मध्ये प्रथम श्रेणी डब्यात प्रवेश करणाऱ्या १६ हजार ६८१ घुसखोर प्रवाशांवर कारवाई केली होती. ही आकडेवारी लक्षात घेता २०२२ मध्ये प्रथम श्रेणीतील डब्यात घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First class fare reduction for non ac local trains mumbai print news amy