मुंबई : मुंबईतील खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्याच्या विरोधात टँकर मालकांच्या संघटनेने गुरुवारपासून संप पुकारला. संपाच्या पहिल्या दिवशी मुंबईत ठिकठिकाणी टँकररस्त्यावर उभे होते. मुंबईतील सुमारे दोन ते अडीच हजार टँकरनी गुरूवारी पाणीपुरवठा केला नाही. हा संप असाच सुरू राहिल्यास विकासकामांना व गृहनिर्माण सोसायट्यांनाही त्याचा फटका बसणार आहे.

मुंबईतील खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे टॅंकर मालकांना या विहिरीतून पाणी भरण्यास विहीर मालकांनी विरोध केला आहे. पालिकेच्या या निर्णयाविरोधात टँकर मालकांच्या संघटनेने १० एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी सर्व टँकर रस्त्यावर उभे होते. एकाही ठिकाणी टँकरने पाण्याचा पुरवठा केला नाही अशी माहिती संघटनेचे पदाधिकारी अमोल मांढरे यांनी दिली. मुंबई महापालिका प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम असून या प्रश्नी तोडगा काढावा म्हणून टँकर मालकांच्या संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवले आहे. मात्र काहीही तोडगा न निघाल्यामुळे या संपाला सुरूवात झाली आहे.

मुंबईत खासगी विहिरींमधील पाण्याचा उपसा करून ते टँकरमधून विविध ठिकाणी पुरवले जाते. पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर केला जात असल्यामुळे भूजलाची पातळी घटत चालली आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सप्टेंबर २०२० मध्ये नवीन नियमावली आणली होती. त्यानुसार विहीर मालकांना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच किती पाण्याचा उपसा करता येईल याबाबतही निकष जाहीर केले आहेत. विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची (सीजीडब्ल्यूए) परवानगी सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत ही परवानगी सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या विहीर मालकांना मुंबई महापालिका प्रशासनाने नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या कीटकनाशक विभागाने या नोटीसा पाठवल्या आहेत. त्यामुळे विहीर मालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी ट्रॅंकर मालकांना पाणी उपसा करण्यास मनाई केली आहे. या निर्णयामुळे अंतिमत: टँकरमालक अडचणीत सापडले आहेत.

संपाचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी फारसा परिणाम दिसला नाही. मात्र हा संप असाच सुरू राहिला तर येत्या एक दोन दिवसात मुंबईत पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत ३८५ विहिरी, विंधन विहिरी, कूप नलिका आहेत. तेथे विहिरीतील पाणी टँकरने भरून ते विविध ठिकाणी पुरवले जाते. पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी या पाण्याचा वापर होतो. विकासकामे, मेट्रोचे बांधकाम, रेल्वे प्राधिकरण, शौचालये, हॉटेल्स, रुग्णालये, सोसायट्या, उद्यानांमध्ये फवारण्यासाठी टँकरने पुरवठा होतो. या सर्व कामांनाही पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

पिण्याच्या पाण्याचे टँकरही आंदोलनात

पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे टँकरही या संपात असल्यामुळे सोसयट्यांनाही पालिकेकडून मिळणारे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही, असेही मांढरे यांनी सांगितले. मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पाणी कमी दाबाने येते. त्यामुळे रहिवाशांना टँकरने पाणी मागवावे लागते. मात्र त्यांनाही संपाचा फटका बसणार आहे.