लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: स्थावर संपदा क्षेत्रातील जुन्या – नव्या दलालांना महारेराचे प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयानुसार ४५७ दलालांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून आता या पात्र ४५७ दलालांची इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेच्या माध्यमातून २० मे रोजी पहिली परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यभरातील १० शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

रेरा कायद्यानुसार विकासक आणि स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. ही नोंदणी असेल तरच घर विक्रीचे व्यवहार करण्यासाठी दलाल म्हणून काम करता येते. मोठया संख्येने ग्राहक दलालांच्या माध्यमातून घर खरेदी-विक्री व्यवहार करतात. पण अशावेळी अनेकदा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण-प्रशिक्षण नाही. त्यामुळे कोणीही हा व्यवसाय करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या, या क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नसलेल्यांना रोखण्यासाठी महारेराने महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

हेही वाचा…VIDEO: ‘या’ तीन प्रश्नांवर राज ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं, एका वाक्यात प्रतिक्रिया देत म्हणाले…

या निर्णयानुसार महारेराने प्रशिक्षण प्रकियेस सुरुवात केली आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वयं प्रशासन संस्थेने (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नस) यासाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. तर आयबीपीएसच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी ५२३ दलालांनी नावे नोंदविली होती. यातील ४५७ जणांनी आता प्रशिक्षण पूर्ण केले असून हे दलाल परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या पात्र दलालांची परीक्षा २० मे रोजी होणार असल्याचे महारेराने जाहीर केले आहे. ही पहिली परीक्षा मुंबई, पुणे, नाशिक आदी १० शहरांतील परीक्षा केंद्रावर होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First exam on 20th may to become broker of real estate sector mumbai print news dvr