१८ खाटांसह तीन कृत्रिम श्वसनयंत्रणा उपलब्ध
शैलजा तिवले
मुंबई : सीएसटीजवळील कामा व आल्ब्लेस या १३५ वर्षे जुन्या रुग्णालयात प्रथमच स्त्रियांसाठी अतिदक्षता विभाग सुरू होणार आहे. १८ खाटांचा हा विभाग सज्ज झाला असून डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रकिया सुरू आहे. त्यामुळे गंभीर प्रकृती झालेल्या स्त्रियांना आता रुग्णालयातच उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कामा व आल्ब्लेस रुग्णालय हे खास स्त्रिया आणि मुलांसाठी असलेले दक्षिण मुंबईतील एकमेव सरकारी रुग्णालय आहे. येथे प्रसूतीसह स्त्रियांशी संबंधित विविध आजारांवर उपचार केले जातात. हे रुग्णालय १३५ वर्षांंपासून सुरू असले तरी अद्याप येथे अतिदक्षता विभाग नाही. त्यामुळे प्रसूतीसह अन्य आजारांमध्ये स्त्रियांची स्थिती खालावल्यास रुग्णाला जवळच्या जे.जे. रुग्णालयात पाठवावे लागते. परंतु आता प्रथमच स्त्रियांसाठी अतिदक्षता विभाग लवकरच कार्यरत होणार आहे.
रुग्णालयात १८ खाटांचा अतिदक्षता विभाग पूर्णपणे तयार केलेला आहे. यात तीन कृत्रिम श्वसनयंत्रणा आहे. हा विभाग चालविण्यासाठी चार डॉक्टर आणि १६ परिचारिकांची आवश्यकता आहे. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पदे भरली की तात्काळ हा विभाग सुरू केला जाईल, असे कामा व आल्ब्लेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढल्यास या अतिदक्षता विभागाचा वापर करोनाबाधित महिलांसाठीही करता येईल, असे डॉ. पालवे यांनी सांगितले.
प्राणवायूसाठी दोन प्रकल्पांची उभारणी
करोनाबाधित रुग्णांसाठी प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून दोन प्रकल्पांची उभारणी रुग्णालयात करण्यात येणार आहे. यातील एका प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले आहे. या शिवाय १३ किलो लिटरचे दोन मोठे सिलेंडरही रुग्णालयात उपलब्ध आहेत.
करोनाबाधित बालकांसाठीही रुग्णालय सज्ज
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने कामा रुग्णालयात ५० खाटांचा करोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. यात ४० खाटा प्राणवायूसह आहेत, तर १० अतिदक्षता विभागाच्या खाटा आहेत. यासाठी आणखी सात ते आठ बालरोगतज्ज्ञांची आवश्यकता आहे. उपलब्ध परिचारिकांचे मनुष्यबळ यासाठी पुरेसे आहे. तसेच या व्यतिरिक्त सध्या ४० खाटांचा बालकांचा विभागही उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास हा विभागही करोनाबाधितांसाठी खुला केला जाणार आहे.