मुंबई : स्त्रीबीजाला उत्तेजन आणि कामा रुग्णालयामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र (एआरटी) सुरू करण्यात आल्यानंतर वर्षभरात वंधत्वाने त्रस्त असलेल्या ४०० हून अधिक महिलांनी रुग्णालयामध्ये नोंदणी केली. या केंद्रात विविध पद्धतीने महिलांवर उपचार करण्यात येत आहेत. वंधत्वाने त्रस्त असलेल्या उत्तर प्रदेशमधील एका ३५ वर्षीय महिलेवर कामा रुग्णालयामध्ये ‘स्त्रीबीज उत्तेजन आणि नियोजित शारीरिक संबंध’ (ओव्हुलेशन इंडक्शन ॲण्ड प्लॅन फिजिकल रिलेशनशीप) या पद्धतीने उपचार करण्यात आले असून त्यामुळे गर्भवती राहिलेल्या या महिलेला बुधवारी दुपारी मुलगी झाली.

लग्नानंतर १५ वर्षे अपत्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या महिलेच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या यशस्वी प्रसूतीमुळे कामा रुग्णालयातील कृत्रिम गर्भधारणा केंद्रातील पहिल्या बाळाचा जन्म झाला.उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास असलेल्या ३५ वर्षीय महिलेचे १५ वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर दोन वर्षांनी त्या महिलेने व तिच्या पतीने बाळाबाबत निर्णय घेतला. मात्र गर्भधारणा होत नसल्याने त्यांनी उत्तर प्रदेशमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू केले. मात्र कोणताही सकारात्मक परिणाम मिळत नव्हते. त्यामुळे तिने वंधत्वावरील उपचारासाठी नेपाळमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

नेपाळमध्ये तिच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरू करण्यात आले. मात्र गर्भाशय आणि अंडाशयातील समस्येमुळे ती गर्भवती राहू शकत नसल्याचे तिला सांगण्यात आले. त्यामुळे हताश झालेल्या या महिलेने अखेर मुंबईतील कामा रुग्णालयात उपचारासाठी येण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी एप्रिलमध्ये कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या या महिलेची डॉक्टरांनी तपासणी केली. हार्मोनल आणि फॉलिक्युलर अभ्यास करण्यात आला. त्यानंतर ‘स्त्रीबीज उत्तेजन आणि नियोजित शारीरिक संबंध’ या उपचार पद्धतीने तिच्यावर उपचार करण्याचा निर्णय कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला.

ही महिला उत्तर प्रदेशमधील असल्याने तिला वारंवार उपचारासाठी यावे लागण्याची शक्यता असल्याने ती आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील कुलाबा येथे वास्तव्यास होती. कामा रुग्णालयाकडून करण्यात येत असलेल्या उपचार पद्धतीला यश येऊन नऊ महिन्यांपूर्वी ही महिला गर्भवती राहिली. या महिलेने बुधवारी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. या महिलेचे सिझेरिन करण्यात आल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली. १५ वर्षांपासून अपत्यासाठी प्रयत्न करत असलेल्या या महिलेला मुलगी झाल्याने त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

दीड लाखांचे उपचार हजारामध्ये

‘स्त्रीबीज उत्तेजन आणि नियोजित शारीरिक संबंध’ या उपचार पद्धतीसाठी खासगी रुग्णालयामध्ये साधारणपणे दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र कामा रुग्णालयामध्ये महिलेच्या उपचाराचा खर्च जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत करण्यात आला असून, महिलेला सुमारे पाच ते सहा हजार रुपये खर्च आल्याचे डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.