भावी पतीसोबत आयुष्याची पुढची स्वप्ने रंगवण्यासाठी निघाली असतानाच तिचे अपहरण झाले व थेट कुंटणखान्यात धाडले गेले. तेथील अत्याचारातून मोठय़ा धाडसाने तिने स्वत:ची सुटका करून घेतली. पण आपल्याविरोधात तक्रार केल्याने चिडलेल्या पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली. नगरमधील तरुणीच्या वाटय़ाला आलेल्या अंगावर शहारा आणणाऱ्या या घटनेने पोलीस खात्याच्या विश्वासार्हतेलाच तडा गेला आहे.
भावी पतीसोबत पुण्यातून ती तरुणी गेल्या गुरुवारी शिर्डी येथे दर्शनाला मोटारीतून जात होती. वाटेत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नगर येथील बिगबझार जवळ तरुणाने मोटार थांबविली. तो दुकानात गेल्यावर तरुणी मोटारीतून खाली उतरली. त्याचवेळी पांढऱ्या मोटारीतून आलेल्या चौघांनी तिच्या तोंडाला रूमाल लावला. त्यानंतर तिची शुद्ध हरपली. तरुणीला जाग आली तेव्हा आपण धुळ्याजवळील शिरपूर येथे एका कुंटणखान्यात आल्याचे तिच्या लक्षात आले. कुंटणखान्यात गिऱ्हाईक म्हणून आलेल्या काही व्यक्तींना खरी कहाणी सांगितल्यानंतर त्यांनी तिच्या भावी पतीशी संपर्क साधला. त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता व पुणे पोलिसांच्या सतर्कतेने तरुणीची सुटका झाली. मात्र, त्यावेळी शिरपूर पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा न टाकता तेथील महिलेस तरुणीला घेऊन येण्यास सांगितले. तरीही त्यांनी गुन्हा मात्र दाखल करून घेतला नाही. पुण्यात आल्यानंतर तरुणीने कुंटणखान्यात आणखी पाच मुली असल्याचे सांगितले. त्यामुळे पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो नगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठी तरूणी, तिचा भावी पती आणि एका पोलीस कर्मचाऱ्यास पाठविले.
पुणे पोलिसांच्या मदतीने सुटका झाल्याने निश्वास टाकलेल्या या तरुणीला तोफखाना पोलिसात आणखीही संकटांना तोंड द्यावे लागेल अशी कल्पना नव्हती. तेथे उपस्थित असलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तिला व तिच्या पतीला खोटी तक्रार आणली, असे सांगत बेदम मारहाण केली. त्यासाठी त्यांनी पट्टय़ाचाही वापर केला. एवढे करूनही गुन्हा दाखल करण्यास नकार मात्र दिला. हतबल तरुणीने पुण्यात येऊन ही कर्मकहाणी पुन्हा पोलिसांना सांगितली, तेव्हा कोरेगावपार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी जबाब नोंदवून घेतला. या तरुणीस उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मारहाण झाल्याची तक्रार आली असून, त्यावर योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे नगरचे पोलीस अधिक्षक आर. डी. शिंदे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा