मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी रात्री अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), एमबीए पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर केली. अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक) अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७६ हजार १११ विद्यार्थी पहिल्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी १ लाख २६ हजार ४५८ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. तसेच व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या (एमबीए) प्रवेशासाठी ३३ हजार ९४२ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील दोन फेऱ्यांमध्ये प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी पसंती देत विक्रमी नोंदणी केली. गतवर्षीच्या तुलनेत अर्ज करणाऱ्यांची संख्या ३४ हजारांनी वाढली आहे. याचा परिणाम पहिल्या प्रवेश फेरीच्या यादीवर दिसून येत आहे. अंतिम गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरलेल्या १ लाख ९२ हजार ३९८ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या प्रवेश फेरीसाठी १ लाख ७६ हजार १११ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले होते. यापैकी १ लाख २६ हजार ४५८ विद्यार्थ्यांना बुधवारी रात्री जाहीर झालेल्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. ४९ हजार ६५३ विद्यार्थ्यांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाच्या दोन फेऱ्या शिल्लक आहेत.
पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ ते १८ ऑगस्टदरम्यान प्रवेश घ्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीनुसार महाविद्यालयातील जागा मिळाली आहे, त्यांना प्रवेश घ्यावाच लागणार आहे. अन्यथा ते पुढील फेरीत सहभागी होण्यास पात्र ठरणार नाहीत. प्रथम पसंतीव्यतिरिक्त अन्य पसंतीक्रम मिळाला आहे, असे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र असणार आहेत. पुढील फेरीत अधिक चांगले महाविद्यालय मिळवण्यासाठी त्यांना ‘नॉट फ्रीझ’ पर्याय निवडावा लागणार आहे. सीईटी कक्षाने व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी जाहीर केली. ४६ हजार १६५ जागांसाठी ५७ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरले होते. यापैकी ३३ हजार ९४२ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना १६ ते १८ ऑगस्टदरम्यान प्रवेश घ्यायचा आहे.