संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधील पहिला हुतात्मा ठरलेल्या १६ वर्षीय सीताराम पवार या वीराच्या विस्मृतीत गेलेल्या फणसवाडीतील स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले असून, आज महाराष्ट्र दिनी त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे वारे वाहत होते. तरुणच नव्हे तर किशोरवयीन मुलेही या चळवळीमुळे भारावून गेली होती. त्यापैकीच एक म्हणजे गिरगावच्या कोळीवाडीत राहणारा सीताराम बनाजी पवार. इंग्रजीची आवड असल्यामुळे सीताराम आपला मित्र मनोहर कोचरेकरबरोबर विल्सन महाविद्यालयात गेले. तेथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या गप्पा रंगल्या आणि भारावलेल्या सीतारामने थेट फ्लोरा फाऊंटन गाठले. त्याच वेळी पोलिसांनी लाठीमार सुरू केला, मात्र आंदोलनकर्त्यांचा आवेश पाहून पोलिसांनी गोळीबार सुरू केला. गोळीबार करणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या हातातून पिस्तूल हिसकावून घेण्यासाठी सीताराम पुढे सरसावला. आपल्या दिशेने येणाऱ्या सीतारामला पोलीस निरीक्षकाने पाहिले आणि त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. सीतारामला पाच गोळ्या लागल्या आणि तो खाली कोसळला. त्याला तात्काळ जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूशी झुंज देणाऱ्या सीतारामचे २१ नोव्हेंबर रोजी प्राणज्योत मालवली. सीताराम धारातीर्थी पडला आणि अख्खी मुंबई हळहळली. आज त्याच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येत आहे.
*फणसवाडीतील बालाजी मंदिरासमोर सीताराम पवार याचे छोटे स्मारक उभारण्यात आले होते. खा. अरविंद सावंत यांच्या निधीतून त्याचे नूतनीकरण करण्यात आले.