Uddhav Thackeray Sena Ex Corporator Abhishek Ghosalkar Shot Dead : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहिसरमध्ये हा थरार घडला असून या थराराचे लाईव्ह फुटेज हल्लेखोर मॉरिसच्या फेसबुक लाईव्हमुळे समोर आले आहेत. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर हल्लेखोर मॉरिसनेही आत्महत्या केली. हा प्रकार कसा घडला याबाबतची सविस्तर माहिती एका प्रत्यक्षदर्शी महिलेने झी चोवीस तासशी बोलताना दिली.
प्रत्यक्षदर्शी महिला म्हणाली, आम्हाला दुपारी ३ वाजता फोन आला की सर्व महिलांनी कार्यालयात या. गणपत पाटील नगर येथे शिवसेनेचे कार्यालय आहे. तिथे आम्हाला बोलावलं होतं. पण आम्हाला का बोलावलं आहे, हे माहीत नव्हतं. तिथे आम्ही दोन तास बसलो. मग आम्हाला आयसी कॉलनीच्या शाखेत बोलावलं गेलं. तिथंही आम्ही दीड तास बसलो. तिथे गेल्यावर कळलं की मॉरिस महिलांना साड्या देणार आहे. पण तिथे दोन मिनिटांसाठी अचानक लाईट्स गेले. त्यावेळी आम्ही शाखेत बसलो होतो, तर मॉरिस बाहेर उभा होता.
हेही वाचा >> मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू, मुंबई पोलिसांकडून माहिती
त्या पुढे म्हणाल्या की, मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलावलं. शाखा आणि मॉरिसचं कार्यालय जवळ आहे. पण पुन्हा ते शाखेत आले. पुन्हा मॉरिस म्हणाले की मुलाखत घ्यायची आहे, कार्यालयात या. त्यामुळे अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर प्रवीण नावाचा कार्याकर्ताही गेला. तो भाईंना (घोसाळकर) बोललाही की काय जायचं? पण तरीही घोसाळकर तिथे गेले. थोड्याच वेळात प्रवीण बाहेर आला आणि म्हणाला भाईला (घोसाळकर) गोळी मारली. गोळी मारल्याचं कळताच सर्व बायका पळाल्या. त्यांना वाचवायला कोणीच पुढे येईना. प्रवीणने त्यांना धरून बाहेर आणलं. मग आम्ही त्यांना धरून रिक्षापर्यंत नेलं. परंतु, एकही रिक्षाचालक रुग्णालयात जायला तयार होत नव्हता. अखेर एका रिक्षावाल्याला आम्ही तयार केलं आणि रिक्षातून आम्ही करुणा रुग्णालयात त्यांना नेलं.
हेही वाचा >> VIDEO : अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबाराचा थरार समोर, कथित हल्लेखोराने स्वतःच्याच फेसबुकवरून केलं होतं लाईव्ह
“आधी त्यांना रुग्णालयात न्या, मग मारेकऱ्यांना शोधा असं मी त्यांना म्हणत होते. पण मॉरिस कुठे पळाला हे कळलं नाही. त्या रस्त्याला अंधार असतो त्यामुळे काही दिसलं नाही”, असंही प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू, मॉरिसची आत्महत्या
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांची हत्या झाली आहे. तर, मॉरिसने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. ANI ने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं.