मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले आहे. १०० टक्के काम पूर्ण झाल्याने आता जानेवारीत या टप्प्याचे लोकार्पण करून स्मारक सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.

दादर येथील महापौर निवासस्थान येथे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थानाचे वारसा जतन आणि संवर्धन करण्यात येत आहे. यात इमारतीचे बांधकाम, स्थापत्य, विद्युत, वातानुकूलित यंत्रणा उभारणी, बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी यासह अन्य कामे केली जाणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय बांधण्यात येणार आहे. त्यानुसार येथे ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय उभारण्यात येत आहे.दरम्यान, पहिल्या टप्प्याच्या कामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली. हा टप्पा आतापर्यंत पूर्ण होऊन सर्वसामान्यांसाठी खुले होणे अपेक्षित होते. मात्र या टप्प्याच्या पूर्णत्वास काहीसा विलंब झाला. आता मात्र १८० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती ‘एमएमआरडीए’कडून देण्यात आली. स्मारकाचा पहिला टप्पा जानेवारीत सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.

हेही वाचा – ‘आयडॉल’मध्येही दुहेरी पदवीचे शिक्षण

दुसरा टप्पाही लवकरच

– स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या म्युझियमच्या माध्यमातून येथे येणाऱ्यांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याचा, त्यांच्या प्रतिमेला स्पर्श करीत असल्याचा अनुभव मिळणार आहे.

– अत्याधुनिक अशा डिजिटल भिंती, लेझर शो, दृकश्राव्य माध्यम, व्हर्च्युअल रियालिटी अशा तंत्रज्ञानाचा वापर करून हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. डिजिटल भिंतीवरील एखाद्या माहितीवर क्लिक केल्याबरोबर माहिती दृक श्राव्य रुपात उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा – ‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम

– दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांना काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून लवकरच कंत्राटदाराची नियुक्त करून या कामाला सुरुवात केली जाणार आहे.

Story img Loader