मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून गेले काही दिवस ब्लॉक घेऊन पुलाचे काम करण्यात येत होते. माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान मिठी नदीवरील पूल क्रमांक २० च्या दक्षिण तळाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्या कामासाठी २४-२५ जानेवारी आणि २५-२६ जानेवारी रोजी ब्लॉक घेण्यात आला होता. या कामाच्या पहिल्या टप्प्यात क्रेनच्या मदतीने ४२ टन वजनाचे २०.४ मीटर लांबीच्या ४ आरएच तुळया उभारण्यात आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्लॉक कालावधीत रेल्वे रुळाखाली सुमारे २.५ मीटर खोदकाम करण्यात आले. ७०० टन क्षमतेची क्रेन, एक्स्कॅव्हेटर, डंपर ट्रक, हायड्रा लिफ्ट, टॅम्पिंग मशीन यांसारख्या अनेक आधुनिक यंत्रांच्या मदतीने हे काम पार पाडण्यात आले. याशिवाय, दोन लोकोमोटिव्ह आणि सुमारे १०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने दिवसरात्र काम केले, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी हे काम करण्यात आले. जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला पूल कमकुवत झाला होता. आता आधुनिक तंत्रज्ञान आणि रचना वापरून त्याची पुनर्बांधणी केली. हा पूल आता मजबूत झाला असून प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. आता पुलाचे अनावश्यक भाग काढणे, तेथे पुनर्बांधणी करणे, तुळईवर रेल्वे मार्ग योग्यरित्या उभारणे असा आव्हानात्मक दुसरा टप्पा मे २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First phase of reconstruction of bridge between mahim bandra stations successfully completed mumbai print news zws