टाटा पॉवर कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या मुंद्रा वीजप्रकल्पातील ८०० मेगावॉटच्या पाचव्या आणि शेवटच्या वीजसंचातून बुधवारी वीजनिर्मिती सुरू झाली आणि तो ग्रीडला जोडला गेला. त्यामुळे विशाल ऊर्जाप्रकल्प धोरणांतर्गत जाहीर झालेल्या चार हजार मेगावॉटच्या वीजप्रकल्पांपैकी पूर्णपणे कार्यान्वित झालेला हा पहिला वीजप्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पातून महाराष्ट्राला एकूण ८०० मेगावॉट वीज मिळणार आहे.
केंद्र सरकारने २००४ ते २००९ या कालावधीत देशातील विजेची गरज भागवण्यासाठी प्रत्येकी चार हजार मेगावॉट क्षमतेचे विशाल ऊर्जाप्रकल्प (अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट) उभारण्याचे धोरण राबवले. त्यानुसार मुंद्रा, सासन, कृष्णपट्टनम, तिलय्या, महाराष्ट्रातील गिर्ये या ठिकाणी असे वीजप्रकल्प राबवण्याचे जाहीर झाले. भूसंपादनाच्या प्रश्नामुळे महाराष्ट्रातील वीजप्रकल्प बारगळला. ‘मुंद्रा’चे काम ‘टाटा पॉवर कंपनी’ला मिळाले. तर सासन, कृष्णपट्टनम, तिलय्या या तीन प्रकल्पांचे काम अनिल अंबानी यांच्या समूहातील ‘रिलायन्स’ला मिळाले. ‘रिलायन्स’चे तिन्ही वीजप्रकल्प रखडले आहेत.
मुंद्रा येथे ‘टाटा पॉवर कंपनी’च्या ‘कोस्टल गुजरात पॉवर लि.’ या कंपनीमार्फत प्रत्येकी ८०० मेगावॉटचा एक वीजनिर्मिती संच अशारितीने पाच संच उभारण्यात आले. हे वीजनिर्मिती संच सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित असल्याने त्यांना तुलनेत कोळसा कमी लागतो आणि राखेचे प्रमाणही कमी राहते. गेल्या वर्षभरात चार संच कार्यान्वित होऊन ३२०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू झाली होती. बुधवारी या विशाल ऊर्जा प्रकल्पातील पाचवा आणि शेवटचा वीजसंच सुरू झाला आणि ग्रीडशी जोडला गेला.
आता येत्या काही दिवसांत त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू होईल. अशारितीने मुंद्रा हा पूर्णपणे कार्यान्वित झालेला विशाल ऊर्जा प्रकल्पातील देशातील पहिला प्रकल्प ठरला आहे.
महाराष्ट्राला मोठा लाभ
या चार हजार मेगावॉटच्या प्रकल्पात महाराष्ट्राचा वाटा ८०० मेगावॉटचा आहे. प्रत्येक ८०० मेगावॉटच्या संचात १६० मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळते. त्यानुसार सध्या सरासरी ६०० मेगावॉट वीज राज्याला मिळत आहे. आता शेवटचा संच पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्राला बाकीची २०० मेगावॉट वीज मिळून पूर्णपणे ८०० मेगावॉट वीज मिळू लागेल.