मधु कांबळे, लोकसत्ता
मुंबई : भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठय़ा सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे. भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. त्यानुसार राहुल गांधी यांची नांदेड येथेच सभा घेण्यात येणार आहे. गांधी यांच्या राज्यात दहा शहरांमध्ये जाहीर सभा होणार आहेत.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून बुधवारी भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथे यात्रेचे आगामन होणार आहे. महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संघटनात्मक पातळीवर राहुल गांधी यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा >>> Shinde vs Thackeray : निवडणूक आयोगानं ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं तर?; शंभूराजे देसाई म्हणाले…
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा १६ दिवसांचा महाराष्ट्रात मुक्काम राहणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ३८३ किलोमीटर पदयात्रा काढण्यात येणार आहे. दरोज २५ किलोमीटर गांधी स्वत: या पदयात्रेतून चालणार आहेत. प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्यासह दररोज शंभर कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार आहेत. २५ किलोमीटरचा प्रवास जिथे संपेल ते मुक्काम करणार आहेत. विशेष म्हणजे १६ दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधी कुठेही हॉटेलमध्ये मुक्काम करणार नाहीत, तर तंबु टाकून त्यात मुक्काम करणार आहेत. मुक्कात ते त्या परिसरातील शेतकरी, विविध समाज घटक, महिला बचत गट यांच्याशी संवाद साधणार आहेत.
अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यात पहिली सभा
महाराष्ट्रात १६ दिवसांच्या दौऱ्यात पदयात्रेबरोबरच दहा शहरांमध्ये राहुल गांधी यांच्या जाहीर सभा होणार आहेत. प्रत्येक सभा ही लाखाच्या वर झाली पाहिजे, त्यादृष्टीने तयारी केली जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड़ जिल्ह्यात यात्रेचे आगमन होणार असून पहिली जाहीर सभाही नांदेड येथेच होणार आहे. बुधवारी नांदेड येथे अशोक चव्हाण व माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत भारत जोडो अभियानाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शेवटची सभा जळगाव जामोद येथे होणार आहे.