शिवसेना खासदार संजय राऊत यांना १०० हून अधिक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर जामीन मिळाला. त्यानंतर अनेक नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवसेनेचेही अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (११ नोव्हेंबर) संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीत नेमकी काय चर्चा झाली त्याची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबादास दानवे म्हणाले, “मी संजय राऊत यांच्या भेटीसाठी आलो होतो, भेट झाली. मागच्या तीन-चार महिन्यापासून प्रत्यक्ष भेट नव्हती. या भेटीत त्यांचे वेगवेगळे अनुभव, किस्से यावर गप्पा मारल्या. येणाऱ्या काळात संजय राऊत शिवसेना नेते म्हणून महाराष्ट्रात पुन्हा ताकदीने नवा लढा उभारतील.”

“त्या गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात”

“संजय राऊत यांच्याशी आगामी मुंबई विधानसभा निवडणुका आणि इतरही चर्चा झाल्या. मात्र, त्या गोष्टी माध्यमांना सांगायच्या नसतात. चर्चा झाली हे नक्की,” असं अंबादास दानवेंनी म्हटलं.

तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार का?

शिवसैनिकांकडून तेजस ठाकरे यांना राजकारणात सक्रीय करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अंबादास दानवे म्हणाले, “तेज ठाकरे राजकारणात येणार की नाही याबाबत मला काही माहिती नाही. कारण, अशाप्रकारची मागणी शिवसैनिकांकडून होत असते. परंतु, राजकारणात येणार की नाही यावर स्वतः तेजस ठाकरेच निर्णय घेतील. मी त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही.”

भाजपा नेत्यांच्या टीकेवर दानवेंची प्रतिक्रिया

संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सत्ताधारी भाजपाकडून जोरदार टीकाही होत आहे. किरीट सोमय्यांनी हिशोब द्यावा लागेल म्हटलंय, तर मोहित कुंबोज यांनी पुन्हा घराबाहेर पडावं लागेल, असं म्हणत राऊतांना टोला लगावला. त्यावर अंबादास दानवे म्हणाले, “महाराष्ट्रात आणि देशात संजय राऊतांची प्रतिमा लढाऊ नेते अशी आहे.”

हेही वाचा : “कोणालाही सोडणार नाही”, फडणवीसांच्या ट्वीटवर संजय राऊतांना प्रश्न, उद्धव ठाकरे म्हणाले, “याचा अर्थ…”

“न्यायालयाच्या तडाख्याने राऊतांवरील कारवाईला योग्य उत्तर”

“महाराष्ट्रात केंद्र सरकार आणि राज्य सरकार गद्दारी करून, ईडी-सीबीआयचा वापर करत आहे. यातूनच त्यांनी संजय राऊत यांना अटक केली. गुन्हा तर लांबच राहिला, पण न्यायालयाने ही अटकच बेकायदेशीर असल्याचं सुस्पष्टपणे म्हटलं आहे. न्यायालयाच्या या तडाख्याने या कारवाईला योग्य उत्तर मिळालं,” असंही अंबादास दानवेंनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First reaction of ambadas danve after meeting sanjay raut in mumbai rno news pbs
Show comments