राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंबेडकरांची भेट घेतली. यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुंबईतील राजगृह येथे प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी या भेटीत काय झालं हे सांगितलं. ते बुधवारी (१६ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली ही वास्तू पाहिली. यात कोणतंही राजकारण नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती.”
“बाबासाहेबांचं वास्तव्य असलेली वास्तू पाहिली”
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाचं भूषण आहे. त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू पाहिली आणि सदिच्छा भेट दिली,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
“या भेटीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही”
“या भेटीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.
“बाबासाहेबांनी खांबाशिवाय राजगृह इमारत उभी केली”
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “राजगृहाची ही इमारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभी राहिली आहे. बाबासाहेबांनी आर्किटेक्चरची मदत न घेता कोणत्याही खांबाशिवाय ही इमारत उभी केली.”
हेही वाचा : VIDEO : “भाजपाला एकनाथ शिंदेही नको आहेत, हे ओझंही…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
“राजगृहमध्ये बाबासाहेबांच्या वाचनाची खोली, अभ्यासाचा टेबल, बसण्याची खुर्ची, सर्व पुस्तकं आणि इतर सर्व बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू पाहिल्या. त्या आजही जशाच्या तशा आहेत. हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो आज मुख्यमंत्री म्हणून मला पाहायला मिळाला,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.