राज्यात विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षांना विरोध करत ऑनलाईन परीक्षेची मागणी करणाऱ्या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला १ फेब्रुवारीला धारवी पोलिसांनी अटक केली. यानंतर गुरुवारी (१७ फेब्रुवारी) त्याला जामीन मंजूर झाला. १७ दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर विकास पाठकने या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी विकास पाठकने मी एका व्यक्तीला खूप मानायचो, मानतो आणि मानत राहिल असं म्हणत हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे माझे आदर्श असल्याचं सांगितलं. तसेच कुणाच्या हक्कासाठी मी तुरुंगात गेलोय तर मला त्यात काही चूक वाटत नाही, असंही नमूद केलं. तो टीव्ही ९ मराठीशी बोलत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकास पाठक म्हणाला, “मला न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो आदेश देईल त्यावर मला विश्वास आहे. मी एका व्यक्तीला खूप मानायचो, मानतो आहे आणि मानत राहिल. ते आहेत स्वर्गीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. ते देखील लाखो लोकांचा आवाज होता. ते लोकांच्या हक्कासाठी खूप लढले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातही खूप साऱ्या अडचणी आल्या. ते त्याला सामोरे गेले, पण त्यांनी कधीही लोकांचा विश्वास तोडला नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्या हक्कासाठी लढले.”

“मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे”

“मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि ते माझे आदर्श आहेत. मी त्यांच्याकडून शिकलो. कुणाच्या हक्कासाठी लढायला मी इथं आलोय आणि तुरुंगात गेलोय, तर मी काही चूक केलीय असं मला वाटत नाही. मी त्यांचा शिवसैनिक आहे आणि त्यांच्याच पावलावर चालतो,” असं विकास पाठकने सांगितलं.

“माझ्या प्रकरणात कुणी दबाव टाकतंय असं मला अजिबात वाटत नाही”

विकास पाठक पुढे म्हणाला, “माझ्या प्रकरणात कुणी दबाव टाकतंय असं मला अजिबात वाटत नाही. मी जेव्हा व्हिडीओ बनवला तेव्हा मी व्हिडीओत सांगितलं होतं की आपल्याला फक्त निवेदन घेऊन जायचं आहे. कुणालाही त्रास होईल असं काहीच करायचं नाही. निवेदन देताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे हेही माझ्या व्हिडीओत आहे, पण अचानक हे कसं झालं हे मला नाही समजलं.”

हेही वाचा : हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठकची तुरुंगातून सुटका

“मला नागपूर पोलिसांकडून एक नोटीस मिळाली आहे. त्यामुळे मी २२ फेब्रुवारीला नागपूरला हजर राहणार आहे. तिथं काही कायदेशीर प्रक्रिया होतील त्यासाठी मी नागपूरला जाईल,” असंही विकास पाठक उर्फ हिंदूस्थानी भाऊने नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First reaction of hindustani bhau vikas pathak when get bail after 17 days in jail pbs