राज्यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी आज (२६ फेब्रुवारी) माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली. हे प्रकरण अतिशय गांभीर्यपूर्ण पद्धतीने हाताळण्यात आले होते. यासाठी राज्याच्या विधानसभेत चर्चादेखील करण्यात आली. या चर्चेमध्ये गृहविभागाने आश्वासित केल्याप्रमाणे उच्चस्तरीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या संदर्भात राज्य सरकारने राज्यातील पोलीस महासंचालकांना आणि आयुक्तांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रश्मी शुक्ला दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे तसेच इतर लोकांचे फोन टॅप करण्यात आले होते. ज्यांचे फोन टॅप करण्यात आले होते त्यांचा संबंध ड्रग्ज अथवा तत्सम अमली व्यवसायाशी असल्याचे कारण पुढे करण्यात आले होते.”
“रश्मी शुक्ला या सध्या सेंट्रल डेप्युटेशनवर कार्यरत असल्याने त्यांच्या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येईल याची कायदेशीर माहिती घेऊन कारवाई करू,” असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. ही कारवाई सूड भावनेतून केली गेली का, अशा आशयाचा प्रश्न माध्यमांद्वारे विचारण्यात आला. त्यावर गृहमंत्र्यांनी असा सूडभावनेचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असे सांगत या प्रश्नाचे खंडन केले.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, “मागील विधानसभा अधिवेशनात यावर चर्चा उपस्थित झाल्यामुळे चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल समोर आल्यानंतरही त्याची सखोल चौकशी केल्यानंतरच कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधी अथवा सरकारी अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीचे भान न ठेवता चुकीच्या पद्धतीने कृती केली, तरी त्या व्यक्तीला शासनाच्या नियमाप्रमाणे शिक्षा केली जाते.”
हेही वाचा : मोठी बातमी, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल
“देशात कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करायचा असेल तर भारतीय तार अधिनियम १९८५ कायद्यान्वये सार्वजनिक सुरक्षा राखण्यासाठी, आंतरिक सुरक्षेसाठी, दहशतवादी कृतींना प्रतिबंध करण्यासाठी, संवेदनशील दखलपात्र गुन्हे प्रतिबंधित करण्यासाठी तसेच परदेशी मित्रराष्ट्रांचे हितसंबंध राखण्यासाठी अनुमती आहे. परंतु यापैकी कोणतेही कारण नसताना रश्मी शुक्ला यांनी ज्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली त्यामध्ये व्यक्तींची नावे बदलून दुसऱ्या नावांची परवानगी घेण्यात आली. ज्यामध्ये नाना पटोले – अमजद खान, बच्चू कडू – निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे – तरबेज सुतार, आशिष देशमुख – रघु चोरगे अशाप्रकारची नावे देण्यात आली,” अशी सविस्तर माहिती गृहमंत्र्यांनी दिली. या व्यक्ती कॉलेज विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विकतात असा रिपोर्ट त्यांनी केला होता. त्याआधारे ही टॅपिंगची परवानगी मिळवली असल्याचे गृहमंत्री म्हणाले.