तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो, असं मत व्यक्त केलं. तसेच शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांचा उल्लेख करत त्यांच्याकडून देशाला खूप प्रेरणा मिळाल्याचंही केसीआर यांनी नमूद केलं.
के. चंद्रशेखर राव म्हणाले, “महाराष्ट्रातून जो मोर्चा निघतो तो खूप यशस्वी होतो. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्ध्यांकडून देशाला खूप प्रेरणा मिळाली. त्याच प्रेरणेवर आम्हाला वाटचाल करायची आहे. आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. अनैतिक गोष्टींविरुद्ध आम्हाला लढायचं आहे. आमच्या दोघांमध्ये आज जी चर्चा झाली त्याचा पुढील काही काळातच खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल.”
“महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळालं”
“मी तेलंगणाची जनता आणि माझ्यावतीने उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्यासाठी आमंत्रित करतो. आज महाराष्ट्राकडून आम्हाला खूप प्रेम मिळालं. हे प्रेम आम्ही सोबत घेऊन जातो आहोत. या प्रेमाचा परतावा करण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असं केसीआर यांनी सांगितलं.
“सर्व विषयांवर आमचं एकमत झालं आणि आम्ही एकजूट आहोत”
केसीआर म्हणाले, “देशाचं राजकारण, देशाच्या विकासाची गती, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशाची स्थिती यावर चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून खूप आनंद झाला. आम्ही अनेक विषयांवर सविस्तर चर्चा केली. अनेक मुद्द्यांवर आमचं एकमत झालं. यापुढे देशाच्या विकासासाठी, देशात चांगल्या सुधारणा करण्यासाठी, विकासाची गती वाढवण्यासाठी, धोरण बदलावरही चर्चा झाली. या सर्व विषयांवर आमचं एकमत झालं आणि आम्ही एकजूट आहोत.”
“पुढील काळात एकत्र काम करण्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. देशात असे अनेक लोक आहेत जे आमच्यासारखा विचार करतात. त्या लोकांसोबत देखील माझी चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरेंसोबतही चर्चा सुरू होती. काही दिवसातच हैदराबाद किंवा इतर ठिकाणी आम्ही सर्व लोक एकत्रित भेटू आणि चर्चा करून एक मार्ग ठरवू,” असंही चंद्रशेखर राव यांनी नमूद केलं.