मुंबई : मुंबईतील पहिलेवहिले सी फूड प्लाझा माहीम कोळीवाड्यातील समुद्र किनारी सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या सी फूड प्लाझाचे उद्घाटन करण्यात आले. सी फूड प्लाझामध्ये येणार्या नागरिकांना खास कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी समुद्रकिनाऱ्यावर तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांना कोळी खाद्यपदार्थांसोबत कोळी नृत्याचाही आनंद घेता येणार आहे. यामुळे मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी मोठी पर्वणी आहे.
कोळीवाड्यांचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोळीवाडे बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना तिथेच खानपानाची व निवासाचीही सुविधा मिळू शकणार आहे. मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबरोबर येथे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार आहे. येथे येणार्या देशी-परदेशी पर्यटकांना वैशिष्ट्यपूर्ण कोळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. तसेच संस्कृती-परंपरेचे दर्शन घडणार आहे. येथे राहण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे. महानगरपालिका यासाठी कफ परेड, वरळी आणि माहीम कोळीवाड्यात प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविणार आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून माहीम कोळीवाड्यात मांसाहारी खाद्यपदार्थांचे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
महिला बचत गटामार्फत चालविण्यात येणार्या पहिल्या सी-फूड प्लाझाचे, तसेच वरळी येथील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोळी भगिनींनी बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला. मुंबईतील कोळीवाडा हे पर्यटनाचे केंद्र ठरावे, यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या विकासासाठी आगामी काळात विविध योजना आणि प्रकल्प राबविले जातील, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
माहीम कोळीवाडा येथील जिल्हा विकास नियोजन निधीमधून मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केसरकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त (जी उत्तर) प्रशांत सपकाळे आदी उपस्थित होते.