मुंबई : मुंबईमधील बेघर कुटुंबांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिकेने सिग्नल शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व उपनगरामध्ये सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे मुंबईतील पहिलीवहिली सिग्नल शाळा सुरू करण्यात येणार आहे. कंटेनरमध्ये सुरू होणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही शाळा साकारण्यात येणार आहे.
मुंबईत उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या अतिगरीब घरातील मुले किंवा घरातून पळून आलेली मुले मुंबईत रस्त्यावरच राहतात. रस्त्यावरचे जगणे जगतात. शिक्षण घेता येत नसल्यामुळे ही मुले पुढे व्यसनाधीन होतात किंवा चुकीच्या मार्गाला लागतात. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी म्हणून मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे व अभिनव पाऊल टाकले आहे. महापालिकेने तब्बल १०० मुलांच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी ‘सिग्नल शाळा’ उभारण्यात येणार आहे. पूर्व उपनगरामध्ये सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल (चेंबूर) येथे ही ‘सिग्नल शाळा’ साकारण्यात येणार आहे.
राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईतील बेघर मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. त्या अनुषंगानेच नाविण्यपूर्ण अशा ‘सिग्नल शाळे’ची उभारणी करण्याचा पर्याय लोढा यांनी सुचवला होता. जिल्हा नियोजन समितीच्या (मुंबई उपनगर) निधीतून सदर प्रकल्पासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. बेघर मुलांच्या शाळेसाठी पूर्व उपनगरामध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने सिग्नल शाळेसाठी चेंबूरमधील अमर महाल येथे जागा शोधली. या शाळेच्या उभारणीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेमध्ये अत्यावश्यक साधनसामग्री, विज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणे आणि साधनसामग्री, संगणक, प्रिंटर्स तसेच शाळेशी निगडित इतर बाबींचा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
समर्थ भारत व्यासपीठ स्वयंसेवी संस्थेने २०१८ मध्ये ठाणे येथील तीनहात नाका येथे सिग्नल शाळा सुरू केली होती. सिग्नल जवळच्या बेघर विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्याच्या शैक्षणिक विकासासाठी ही संस्था काम करीत आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण घेतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षणही घेतले आहे. याच धर्तीवर मुंबईत पूर्व उपनगरात एक सिग्नल शाळा उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने पुढाकार घेतला आहे. साधारणपणे ६० ते १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची ही शाळा उभारण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अधिकाधिक अद्ययावत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या शाळांच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसोबतच कुटुंबाच्या सामाजिक प्रगतीचा प्रयत्नही करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.