मुंबईकरांची प्रवासवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबई लोकलचे वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडले. चर्चगेटहून बोरिवलीला जाणाऱ्या लोकलचे कपलिंग तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी ही लोकल आता कारशेडला रवाना करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देखभाल दुरुस्तीसाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. आज (२२ ऑक्टोबर) गोरेगाव ते बोरिवली दरम्यान जलद अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळण्यात आल्या आहेत. परिणामी लोकल सेवेला फटका बसला आहे. तर, दुसरीकडे चर्चगेटहून बोरिवलीकडे जाणारी लोकल मरिन लाईन्सला येताच नादुरुस्त झाली. या लोकलची कलपिंग तुटल्याने मागच्या डब्यांशी लोकलचा संपर्क तुटला. परिणामी ही लोकल स्थानकावरच उभी राहिली. कपलिंग तुटल्यानंतर जवळपास पाऊण ते तासभर ही लोकल मरिन लाईन्सवर उभी राहिल्याने मागून येणाऱ्या गाड्यांच्या वेळपत्रकाला फटका बसला. परंतु, लोकल खोळंबून राहू नयेत म्हणून डाऊन मार्गावरची वाहतूक अप मार्गावरून पुढे नेण्यात आली आहे. तसंच, काही वेळानंतर नादुरुस्त झालेली लोकलही कारशेडला रवाना करण्यात आली.

सकाळी ११.०२ मिनिटांनी लोकलचा तिसरा डबा इतर डब्यांपासून वेगळा झाला. मरिन लाईन्स स्थानकात ट्रेन येत असतानाच हा अपघात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसंच, प्रवाशांनाही तत्काळ लोकलबाहेर काढण्यात आले. तसंच, लोकल कारशेडला रवाना करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती X समाजमाध्यमावर दिल्यानंतर अनेक नेटिझन्सने त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेल्वे गाड्यांचं सर्व्हिसिंग व्यवस्थित होत नसल्याचं एका युजरने म्हटलं आहे. तर, पहिल्यांदाच असं काहीतरी घडताना पाहतोय, असं एका युजरने म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First time seen something like this happen the local coaches separated as they entered the station read the incident at marine lines sgk