मुंबई : रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरला मारहाण होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. परंतु केईएम रुग्णालयातील डॉक्टरनेच शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास क्ष किरण तंत्रज्ञाला मारहाण केली. यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि तंत्रज्ञ, कर्मचारी यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत संबंधित डॉक्टरविरोधात कारवाईची मागणी करीत आंदोलन केले. अखेर रुग्णालय प्रशासनाने संबंधित डॉक्टरला तीन दिवसांसाठी निलंबित केले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी औपचारिक चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अखेर तीन दिवसांनी कुर्ला स्थानकातून बेस्टची सेवा सुरू

केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागामध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रथम वर्षाला असलेले डॉ. निखिल वाडेकर शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास नवीन इमारतीमधील क्ष किरण विभागामध्ये एका रुग्णाला क्ष किरण तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्यावेळी तेथे कर्तव्यावर असलेले रेडिओलॉजी तंत्रज्ञ दीपक जाधव यांनी त्यांच्याकडे रुग्ण आणि डॉक्टरांच्या युनिटबद्दल माहिती विचारली. यावरून रेडिओलॉजी तंत्रज्ञ दीपक जाधव आणि डॉ. निखिल वाडेकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. डॉ. निखिल वाडेकर यांनी जाधव यांना मारहाण केली. तेथे असलेल्या प्रत्यक्षदर्शींनीही त्याला दुजोरा दिला. त्यामुळे म्युनिसिपल मजदुर युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयात आंदोलन करून संप पुकारला. काही काळ त्याचा रुग्ण सेवेवर परिणाम झाला. याची दखल घेत केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. हरिश पाठक यांनी कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी डॉ. निखिल वाडेकर यांची वागणूक अत्यंत अयोग्य, अव्यावसायिक आणि निवासी डॉक्टरांच्या अपेक्षित आचारसंहितेचे उल्लंघन करणारी असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती म्युनिसिपल मजदुर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.

हेही वाचा >>> टास्कच्या नावाखाली महिलेची ४९ लाखांची फसवणूक, आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मुंबई महानगरपालिका सेवा व शिस्त अधिनियम आणि नियमांनुसार प्राथमिक शिस्तभंगाची कारवाई म्हणून डॉ. निखिल वाडेकर यांना तत्काळ प्रभावाने कामकाजाच्या तीन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. तसेच निलंबनाच्या कालावधीत रुग्णालयाच्या आवारात जाण्यापासून, वैद्यकीय सेवा देण्यापासून, तसेच रुग्णालयातील कर्मचारी किंवा रुग्णांशी संवाद साधण्यावर बंदी घालण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक औपचारिक चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चौकशी प्रक्रियेदरम्यान डॉ. निखिल वाडेकर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार असून, चौकशीच्या निष्कर्षावर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First year doctor assaults x ray technician at kem hospital mumbai print news zws