मुंबई : ज्याला कल्ले नाहीत, शेपूट नाही आणि डोळेही नाही अशा एका माशाचा शोध मुंबईत लागला आहे. जोगेश्वरीच्या एका विहिरीत सापडलेला हा मासा सापासारखा दिसत असून त्याचे नाव ‘रक्तमिच्टिस मुम्बा’ असे ठेवण्यात आले आहे.

संशोधक पवनकुमार, प्रवीण राज, अनिल मोहपात्रा, तेजस ठाकरे यांना २०१९मध्ये जोगेश्वरीतील एका विहिरीत मासा सापडला होता. त्यानंतर साधारण दोन वर्षे त्याच्यावर संशोधन सुरू होते. विहिरीत पाणी पाझरण्याच्या जागी असलेल्या लाल मातीत हा मासा सापडला. त्याला डोळे नसल्याने केवळ वासावरून तो भोवतालच्या वातावरणाचा अंदाज घेतो व छोटे किडे खातो. अशा प्रकारे डोळे नसलेला हा महाराष्ट्रातील गोडय़ा पाण्यातील पहिलाच मासा आहे. अशा प्रकारचे मासे यापूर्वी महाराष्ट्राबाहेर सापडले आहेत. रक्तमिच्टिस डेग्रसिस, रक्तमिच्टिस रोसिनी, रक्तमिच्टिस इंडिकस या प्रजाती केरळमध्ये तर रक्तमिच्टिस रांगसा या प्रजाती मेघालयामध्ये सापडतात. या सर्व प्रजाती आणि रक्तमिच्टिस मुम्बा यांच्या बरगडीच्या हाडांमध्ये फरक आहे. मुम्बा ही रक्तमिच्टिस कुळातील पाचवी प्रजात आहे. मुम्बाची त्वचा पारदर्शक असून त्याच्या शरीरातील लाल रक्तवाहिन्यांमुळे तो लालसर रंगाचा दिसतो.