मत्स्य दुष्काळाचे सावट, मच्छीमारांची केंद्रीय संस्थेकडे तक्रार
अक्षय मांडवकर, मुंबई</strong>
काही मासे दुसऱ्या प्रदेशात शिरून माणसांना आवडणाऱ्या माशांना फस्त करू लागले तर माणसांनी ‘त्या’ माशांची तक्रार करावी का? हा प्रश्न पडण्याचे कारण मच्छीमारांनी ‘काळ्या माशा’विरुद्ध केलेली तक्रार. हा ‘काळा मासा’ महाराष्ट्राच्या सागरी हद्दीतील सुरमई, बांगडा अशा चविष्ट माशांचा कर्दनकाळ ठरत असल्याने मत्सदुष्काळाचे सावट आहे, असे या तक्रारीतील गाऱ्हाणे.
आपल्यापैकी अनेकांना जसे चंदेरी शरीराचा सुरमई, चकाकत्या पाठीचा बांगडा आणि सुकवल्यावर या दोन्ही माशांच्या चवीला आव्हान देणारा माकुळ (स्क्विड) हे मासे आवडतात. तसेच ते या ‘काळ्या माशा’लाही आवडतात. या माशाचे नाव ‘ट्रिगर फिश’. तो आक्रमक आहे. त्याच्या भुकेमुळे मासळीप्रेमींच्या आवडत्या माशांवर संक्रात येत असल्याची तक्रार कोकणासह मुंबईतील मच्छिमारांनी ‘केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे’कडे (सीएमएफआरआय) केली आहे. पाच महिन्यांपासून हा ‘ट्रिगर फिश’ राज्याच्या किनारपट्टीजवळच्या क्षेत्रात धुमाकूळ घालत असल्याचे मच्छीमारांचे म्हणने आहे.
‘ट्रिगर फिश’विरुद्धच्या तक्रारीची गंभीर दखल ‘सीएमएफआरआय’ने घेतली आहे. शास्त्रज्ञांनी अभ्यास सुरू केला आहे. समुद्रातील प्रवाहबदलांमुळे (करंट वेव) हे मासे राज्याच्या सागरी परिक्षेत्रात आले असावेत, असे प्राथमिक निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
खोल समुद्रातील प्रवाळांमध्ये राहणाऱ्या ‘ट्रिगरफिश’च्या झुंडी ऑक्टोबरपासून राज्याच्या किनारपट्टीजवळच्या भागात आल्याचे मच्छिमार सांगतात. साधारण ३० ते ४० मीटर खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या पर्ससीन आणि ट्रॉलर बोटींच्या जाळ्यात मासे अडकत आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ातील पर्ससीन जाळ्यांच्या बोटीत दररोज आठ ते १० टन आणि ट्रॉलर बोटींच्या जाळ्यात तीन ते चार टन ‘ट्रिगरफिश’ अडकतात, अशी माहिती मिरकरवाडा बंदरावरील मच्छिमार नामदेव शिरगांवकर यांनी दिली.
मुंबईच्या ससून डॉकवर दररोज १५ ते १७ टन ‘ट्रिगरफिश’ येत असल्याचे पर्ससीन संघटनेचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी सांगितले.
‘ट्रिगरफिश’ खाण्यायोग्य नसल्याने त्यांना बाजारात भाव नाही. पण त्यांच्या झुंडी सुरमई, बांगडा, माकुळ यांच्या मागे लागतात आणि जाळ्यात अडतात. नोव्हेंबरमध्ये त्यांच्या झुंडीच्याझुंडी जाळ्यात सापडू लागल्या आणि मच्छीमार चक्रावले. ‘‘या माशांविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे हे मासे आम्ही फेकून दिले. परंतु त्यांचा वापर कोंबडय़ांचे खाद्य म्हणून करतात असे समजल्यामुळे ते १५ रुपये किलोने विकत आहोत. परंतु हा व्यवहार तोटय़ाचा असल्याचे ससून डॉक येथील मच्छीमार शुभम पाटील यांनी सांगितले.
‘ट्रिगरफिश’मुळे मागणी असलेल्या माशांच्या मासेमारीवर परिणाम झाल्याचा दावा मच्छिमारांनी केला आहे. त्याला शास्त्रज्ञांनीही दुजोरा दिला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये सुरमई, बांगडा हे मासे जाळ्यात सापडण्याचे प्रमाण घटल्याची माहिती ‘सीएमएफआर’चे शास्त्रज्ञ डॉ. नाखवा यांनी दिली. ‘ट्रिगरफिश’च्या अतिक्रमणाचा हा परिणाम असण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. ‘ट्रिगरफिश’ची पिल्ले सुरमई, बांगडा यांचे खाद्य असलेल्या छोटे सागरी जीव आणि माशांवर ताव मारतात. ‘ट्रिगरफिश’च्या चाचणीत त्यांच्या पोटातून माकुळ, सुरमई-बांगडय़ांचे अवशेष सापडले, असेही डॉ. नाखवा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
मोठय़ा प्रमाणात सागरी प्रवाळ असलेल्या लक्ष्मद्वीप क्षेत्रात ट्रिगरफिश आढळतात. काही महिन्यांपूर्वी सागरातील अंतर्गत प्रवाह उत्तरेकडे सरकल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रवाहाबरोबर हे मासे महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात दाखल झाले असावेत.
– डॉ. अजय नाखवा, सीएमएफआरआय