‘व्हिवा लाउंज’मध्ये लीना मोगरे यांचा कानमंत्र
वयानुसार येणारे शारीरिक आजार, आजच्या धावपळीच्या युगात नोकरी, व्यवसाय, शिक्षण यामुळे निर्माण होणारे ताण-तणाव किंवा तत्सम समस्यांवर ‘फिटनेस’ हा एकच उपाय आहे. किंबहुना, निरोगी आणि सुंदर आयुष्यासाठी ‘फिटनेस’ हीच गुणवत्ता आहे. त्यामुळे ‘फिटनेस’ ही जीवनशैली झाली पाहिजे, असे प्रतिपादन ‘पर्सनल फिटनेस ट्रेनर’ लीना मोगरे यांनी शुक्रवारी मुंबईत केले.
‘फिटनेस’ हा शब्द एखाद्या संकटासारखा उच्चारला जातो. प्रत्यक्षात व्यायामामुळे मन आनंदी ठेवणारे हार्मोन्स उत्तेजित होतात. त्याचा परिणाम म्हणून शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही साधले जाते, अशा शब्दांत निरोगी आयुष्याचा गुरुमंत्र देणाऱ्या लीना मोगरे या शुक्रवारी झालेल्या ‘व्हिवा लाउंज’च्या तिसाव्या अतिथी होत्या. ‘लोकसत्ता’ आयोजित ‘केसरी’ प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रमाला दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेली गर्दी ‘फिटनेस’ हा विषय लोकांच्या किती जिव्हाळ्याचा आहे, याची प्रचिती देणारी होती. लीना मोगरे यांनी पूर्वीच्या काळी ‘फिटनेस’चे एवढे स्तोम नव्हते, असे सांगतानाच आता ‘डाएट’ आणि ‘फिटनेस’ हे परवलीचे शब्द झाल्याचे स्पष्ट केले. याबद्दल बोलताना आपण सगळे ‘प्रोफेशनल सिटर्स’ बनलो आहोत, असे त्या म्हणाल्या. नोकरी -व्यवसायात बसून काम करावे लागते, जाणे-येणे गाडय़ांमधून बसूनच होते, घरातील कित्येक कामेही बसून केली जातात. यामुळेच पाठदुखीपासून अनेक आजार सुरू झाले आहेत. या आजारांवर मात करण्यासाठी व या आजारांना दूर ठेवण्यासाठी व्यायाम ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे मोगरे यांनी स्पष्ट केले. ‘फिटनेस’साठी बाजारात उपलब्ध असणारी प्रोटिन्स शेक किंवा कॉर्नप्लेक्ससारख्या तयार पदार्थाची गरज नाही. पोहे, उपमा यासारखा नाश्ता, आपले भारतीय पद्धतीचे जेवण योग्य आहे. मात्र तुम्ही काय, किती आणि कुठल्या वेळी खाता याचे योग्य नियोजन असले पाहिजे. तुमच्या कामाच्या वेळा, आहार आणि व्यायाम याचा योग्य समतोल साधला तर ‘फिटनेस’ हे अवघड कोडे राहणार नाही, असेही मोगरे यांनी सांगितले.
सविस्तर
शुक्रवारच्या ‘व्हिवा’ पुरवणीत

’कार्यक्रमाला झालेली गर्दी ‘फिटनेस’ हा विषय लोकांच्या किती जिव्हाळ्याचा आहे, याची प्रचिती देणारी होती. ’‘फिटनेस’बद्दल लोकांच्या मनात असलेला बागुलबुवा दूर करून तो त्यांच्या आनंददायी जीवनशैलीचा भाग कसा होऊ शकतो, हे मोगरे यांनी अत्यंत सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले.

दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात शुक्रवारी झालेल्या व्हिवा लाउंज कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फिटनेस गुरू लीना मोगरे यांनी निरोगी आयुष्याचा कानमंत्र यावेळी उपस्थितांना दिला. (छाया : दिलीप कागडा)

Story img Loader