धकाधकीच्या प्रवासामध्ये सुखकर आणि वातानुकूलित प्रवासाचे मुंबईकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मेट्रो की मोनो या वादात काही पावले पुढे जात मोनोने बाजी मारली आहे आणि पूर्व उपनगरातील काही भागातील प्रवाशांना गतीमान आणि आरामदायी प्रवास करण्याची संधी ऑगस्ट महिन्यापासून मिळणार आहे. मोनो रेल चालविण्यासाठी पहिल्या पाच कॅप्टन्सची टीम सज्ज झाली आहे.
कौलालम्पूरपेक्षा अधिक अत्याधुनिक असलेल्या या गाडीमध्ये आसनक्षमता कमी असली तरी प्रवाशांना व्यवस्थित उभे राहून प्रवास करता येतो. एका डब्यामध्ये १२० प्रवासी सहजगत्या उभे आणि बसून प्रवास करू शकतात. मोनो रेलची संपूर्ण यात्रा संगणकावर आधारित आहे.
या गाडीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी शिरले वा दरवाजाजवळ उभे असले तर दरवाजे बंद होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे गाडी सुरू होणार नाही. प्रवाशांची संख्या क्षमतेपेक्षा वाढली की, त्याबाबतची सूचना चालकाला समोरील कंट्रोल पॅनेलवर दिसते. त्याची कल्पना स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांना कळविता येते. गाडीमध्ये प्रवाशाला काही अडचण आली तर तो दरवाजाजवळ असलेल्या आपत्कालिन यंत्रणेचे बटन दाबून त्वरित गाडीच्या चालकाला आपली अडचण सांगू शकतो. त्याचप्रमाणे दरवाजे स्थानकात गाडी आल्यावर उघडले नाहीत किंवा बंद झाले नाहीत तर दरवाजाच्या बाहेरील बाजूस तसेच आतील बाजूस एक कळ ठेवण्यात आली आहे. ती फिरवली की दरवाजे उघडू किंवा बंद होऊ शकतात. पण कोणी गाडी सुरू असताना ती कळ फिरवण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण गाडीमध्ये धोक्याची घंटा वाजू लागते. दरवाजे कोणत्याही स्थितीमध्ये गाडी सुरू असताना उघडे राहू शकत नाहीत.
गाडीच्या दोन्ही दिशेला असलेल्या पायलट कॅबिनमधील कंट्रोल पॅनलवर गाडीचे स्वयंचलित नियंत्रण असते. विमानाचे कंट्रोल पॅनेल आणि मोनो रेलचे कंट्रोल पॅनेल यामध्ये काही प्रमाणात साम्य असले तरी त्यात तांत्रिकदृष्टय़ा बरेच फरक आहेत. मलेशियाच्या कारखान्यामध्ये या गाडीच्या डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. साधारण एक गाडी तयार होण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागत असून संपूर्णपणे यांत्रिक पद्धतीने या डब्यांचीच नव्हे तर गाडीची बांधणी होत असते. गाडीचे चारही डबे आतून एकमेकांना जोडलेले असतात. या जोडलेल्या भागामधून प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नसली तरी हे भागही तितकेच मजबूत असल्याचे शनिवारच्या प्रवासाच्या वेळी जाणवले. एकमेकांमध्ये इंटरलॉकींग करून हे डबे जोडलेले असल्याने ते अचानक सुटणे किंवा तुटणे असे संभवत नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
३५ कॅप्टन्सची आवश्यकता
वडाळा ते चेंबूर या प्रवासामध्ये गाडी चालविण्यासाठी सध्या ३५ कॅप्टन्सची आवश्यकता असून केवळ दोन कॅप्टन्स तयार आहेत तर उर्वरित तिघांचे प्रशिक्षण सुरु आहे. महिला कॅप्टन्सच्या प्रशिक्षणाची पूर्वतयारी स्कोमी कंपनीने केली आहे, अशी माहिती या कंपनीचे प्रचालन आणि देखभाल विभागाचे प्रमुख मार्शल येसाइहा यांनी दिली. नव्याने भरती होणाऱ्या कॅप्टन्सना सिम्युलेटरद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नंतर त्यांना प्रत्यक्ष मोनो रेल चालविण्याचे प्रशिक्षण मिळेल. गाडी मध्येच थांबल्यास अथवा प्रवाशांची आणीबाणी काळात सुटका करणे, अपघात झाला तर मदत करणे आदी प्रशिक्षण मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य संबंधित यंत्रणांद्वारे देण्यात येत आहे.
अत्याधुनिक ‘मोनो रेल’साठी तूर्तास पाच कॅप्टन्स तयार!
धकाधकीच्या प्रवासामध्ये सुखकर आणि वातानुकूलित प्रवासाचे मुंबईकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मेट्रो की मोनो या वादात काही पावले पुढे जात मोनोने बाजी मारली आहे आणि पूर्व उपनगरातील काही भागातील प्रवाशांना गतीमान आणि आरामदायी प्रवास करण्याची संधी ऑगस्ट महिन्यापासून मिळणार आहे.
First published on: 19-02-2013 at 06:01 IST
TOPICSमोनोरेल
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five caption ready for monorail so far