मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) प्रवासी संख्येचा ओघ वाढला असून गेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) ५ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. त्या पूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत प्रवासी संख्येत १६ टक्क्यांनी वाढ झाली असून २०२२-२३ या वर्षांत ४ कोटी ३९ लाख प्रवासी संख्येची नोंद झाली आहे.
मुंबई विमानतळावर नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ मध्ये प्रवासी संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मुंबई विमानतळावर २५ नोव्हेंबर रोजी एका दिवसांत सर्वाधिक म्हणजे १,६७,१३२ प्रवाशांची नोंद झाली. त्यातील १,२०,००० हून अधिक देशांतर्गत तर ४६,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता. डिसेंबर २०२३ मध्ये ४ कोटी ८९ लाख प्रवाशांची नोंद झाली. सीएसएमआयएने करोना महामारीपूर्वीच्या काळाच्या तुलनेत जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ११० टक्के प्रवासी वाढले आहेत.
सीएसएमआयएवरून अल्माटी, लागोस, जाकार्ता, एन्टेबल आणि मेलबर्न या ठिकाणीही विमानसेवा सुरू झाली आहे. तसेच पॅरिस, नैरोबी, फ्रॅकफर्ट, लंडन, दोहा, हनोई, हो ची मिन्ह सिटी या ठिकाणांच्या वारंवारतांमध्ये वाढ करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत लंडनमधील प्रवासी वाहतूकीमध्ये ५५ टक्क्यांची वाढ झाली. तर इस्तांबुलमधील प्रवासी वाहतुकीमध्ये ६६ टक्क्यांची वाढ झाली आहे.