मालवाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणावर वापर होणाऱ्या आणि उत्तर-दक्षिण भारताला जोडणाऱ्या वसई-दिवा मार्गावर गुरुवारपासून पाच दिवसांचा मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. या काळात एकही गाडी रद्द करण्यात येणार नाही तसेच गाडय़ांच्या वेळेतही बदल करण्यात येणार नाही. यासाठी मार्ग सक्षमीकरणाच्या विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, रेवस, दिघी, जयगड तसेच दक्षिणेकडील अन्य काही बंदरांमधून माल वाहतूक उत्तर भारतात करण्यासाठी दिवा-वसई मार्गाचा वापर करण्यात येतो. दिवसाला या मार्गावरून सुमारे ४४ मालगाडय़ा, वसई-पनवेल या मार्गावर आठ डीएमयू गाडय़ा तसेच २४ मेल एक्स्प्रेस गाडय़ा धावतात. सध्या जवाहरलाल नेहरू बंदरामध्ये काम कमी असल्यामुळे ४४ ऐवजी केवळ ३२ गाडय़ा धावत आहेत. या गाडय़ांचे वेळापत्रक जराही न बिघडवता  पाच दिवसांचा सलग मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. भिवंडी ते खारबाव या  मार्गावरील वाहतूक दुसऱ्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वळविण्यात येणार असली तरी सिग्नल्स जुन्याच मार्गावरून कार्यरत होतील, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
ब्लॉक असलेल्या मार्गात गाडय़ांचा वेग थोडा कमी ठेवण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेग केवळ १० मिनिटांनी वाढणार आहे. उपनगरी मार्गावर घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकप्रमाणे येथे काम करायचे झाले तर नऊ किमीसाठी तब्बल ६० दिवस मेगा ब्लॉक घ्यावा लागला असता. तसेच वाहतूकही पूर्णत: विस्कळीत झाली असती, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले.

Story img Loader