जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाला ५० हजार रुपयांत विकण्याचा घृणास्पद प्रकार डॉक्टरांच्या सावधगिरीमुळे गुरुवारी रात्री उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आईसह पाचजणांना अटक केली आहे. वसई विरार महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील वाडकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
सविस्तर हकीकत अशी, दीपाली विठ्ठल खटावकर (२०, रा. नायगाव,) यांना ३० जानेवारीला मुलगा झाला. खटावकर यांनी दोन वेगवेगळ्या नावांनी डीडीएम पेटीट रुग्णालयात डिलिव्हरीसाठी नोंदणी केली होती. त्यावरून संशय आल्यामुळे डॉक्टरांनी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.
बाळाला जन्म दिल्यानंतर तिने आपला मित्र भूषण कोरगावकर यांच्या साथीने ते विकण्याचा डाव रचला. अक्षता कदम यांनीही दोघांना याकामात मदत केली. त्यांनीच एका जोडप्याला हे मूल विकण्याचे ठरविले. त्यासाठी ५० हजार रुपयांचे बोली ठरविण्यात आली होती. मात्र, दिपालीच्या संशयित हालचालींबद्दल डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा पोलिसांनी दिपाली, भूषण आणि अक्षता यांच्यासह संबंधित जोडप्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि ही घटना उघडकीस आली.

Story img Loader